ग्लासगो : अंतिम क्षणी मोक्याच्या वेळी झालेल्या चुका मला महागात पडल्या आणि त्यामुळे माझ्या हातून ऐतिहासिक सुवर्णपदक निसटले, अशी खंत भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केली. जबरदस्त चुरशीचा झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अनेकांनी वर्षातील सर्वोत्तम महिला एकेरीचा सामना म्हणून पसंती दिली.जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या सिंधूने सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात जपानच्या नोजोमी ओकुहाराने अंतिम क्षणी सिंधूकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत २१-१९, २०-२२, २२-२० अशी बाजी मारली. निर्णायक गेममध्ये सामना २०-२० असा बरोबरीत असताना सिंधूला एका चुकीमुळे एक गुण गमवावा लागला आणि हाच गुण निर्णायक ठरला होता. या चुकीविषयी सांगताना सिंधू म्हणाली, ‘मी दु:खी आहे. तिसºया गेममध्ये २०-२० अशी बरोबरी असताना कोणीही विजयी ठरली असती. प्रत्येक जण सुवर्णपदकाचा निर्धार करून स्पर्धेत खेळत असतो आणि मी या पदकाच्या खूप जवळ आले होते, मात्र अंतिम क्षणामध्ये सर्व काही बदलले.’त्याचप्रमाणे, ‘ओकुहाराला नमवणे सोपे नाही. जेव्हा पण आम्ही एकमेकांविरुद्ध खेळलो, तेव्हा तो सामना सहजपणे पार पडला नाही. खूप मोठ्या आणि कडव्या रॅलीज खेळल्या गेल्या. तिला मी कधीही गृहीत धरले नाही. सामना लांबलचक खेळण्यासाठी मी सज्ज होते. परंतु, मला वाटते, की हा दिवस माझा नव्हता,’ असेही सिंधूने या वेळी म्हटले.स्पर्धेचा अंतिम सामना एक तास ४९ मिनिटांपर्यंत खेळला गेला. हा सामना थकवा आणणारा होता, असे सांगताना सिंधू म्हणाली, ‘हा सामना मानसिक आणि शारीरिकरीत्या खूप थकवणारा होता. प्रत्येक रॅली लांबलचक खेचली गेली आणि आमच्यापैकी कोणीही ढिलाई न देता कडवे आव्हान उभे केले. आम्ही १४-१४, १८-१८ अशा गुणांसह पुढे जात होतो आणि २०-२० अशा गुणसंख्येनंतर कोणीही विजयी होऊ शकत होते. हा खूप मोठा सामना होता, तसेच खूप चांगला सामना झाला, परंतु दुर्दैवाने मी जिंकू शकली नाही.’म्हणून सायना अपयशी ठरलीमला सायनाविषयी वाईट वाटते. तिला उपांत्य सामन्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. तिचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रात्री उशिरापर्यंत रंगला आणि पुन्हा सकाळी तिला उपांत्य सामन्यात खेळावे लागले. माझ्या मते स्पर्धेचे वेळापत्रक योग्य पद्धतीने आखले गेले नाही आणि यामुळे अनेक समस्या उद्भवल्या. टीव्हीनुसार स्पर्धेचे वेळापत्रक तयार केले गेले नाही पाहिजे. यासाठी मी तांत्रिक अधिकाºयांना जबाबदार धरेल. खेळाडूंना एका सामन्यानंतर थकवा घालवण्यासाठी आवश्यक वेळ मिळेल, अशी योजना करायलाच पाहिजे. ही एक समस्या आहे जी अधिकाºयांपुढे ठेवली गेली पाहिजे. - विमलकुमार, सायनाचे प्रशिक्षकया स्पर्धेत दोन पदक जिंकण्यात यश मिळाल्याने भारतीय म्हणून आपल्याला अभिमान आहे. सायनानेही चांगले प्रदर्शन केले. देशासाठी मी रौप्य जिंकण्यात यशस्वी ठरले, याचा मला गर्व आहे. या कामगिरीनंतर मला आणखी आत्मविश्वास मिळाला असून भविष्यातही मी आणखी जेतेपद जिंकेल.- पी. व्ही. सिंधू
अंतिम क्षणी झालेल्या चुका महागात पडल्या, निसटलेल्या सुवर्णपदकाबाबत सिंधूनं व्यक्त केली खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 4:18 AM