ग्वांग्झू : ऑलिम्पिक रौप्य विजेती स्टार शटलर पीव्ही सिंधू आणि समीर वर्मा यांनी वर्चस्वपूर्ण खेळ करीत गुरुवारी येथे विजय नोंदवीत वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटनच्या बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सिंधूने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना पिछाडीवर पडल्यानंतरही जगातिक क्रमवारीत नंबर वन असलेली ताय जू यिंग हिच्यावर शानदार विजय साजरा केला. दुसरीकडे, समीरने इंडोनेशियाचा टॉमी सुगियार्तो याला सरळ गेममध्ये पराभूत केले.तैपईची ताय जूविरुद्ध १३ लढतीत सलग सहावेळा पराभूत झालेल्या सिंधूने एक तास चाललेल्या संघर्षात १४-२१, २१-१६, २१-१८ असा विजय साजरा केला. या विजयासह सिंधूच्या पराभवाची मालिकादेखील खंडित झाली आहे. विश्व क्रमवारीत १४ व्या स्थानारील समीरने ब गटात ४० मिनिटांत दहाव्या स्थानावरील सुगियार्तोचा २१-१६,२१-७ ने पराभव केला. २४ वर्षांच्या समीरने काल पहिला सामना विश्व चॅम्पियन केंटो मोमोतोविरुद्ध गमावला होता. पुढील सामन्यात समीरला थायलंडच्या केंटाफोन वांगचारोनविरुद्ध लढत द्यावी लागेल. (वृत्तसंस्था)
सिंधूचा ताय जूविरुद्ध लक्षवेधी विजय; समीरने सुगियार्तोला दिला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 1:32 AM