हाँगकाँग : भारताची स्टार शटलर आणि रिओ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने आपली विजयी घोडदौड कायम राखताना हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सिंधूने आक्रमक खेळ करताना जपानच्या अया ओहोरी हिचे कडवे आव्हान सरळ दोन गेममध्ये परतावले. त्याच वेळी, भारताच्या अनुभवी सायना नेहवालला मात्र स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. तिने गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात चीनच्या युफेई चेनविरुद्ध सायनाचा पराभव झाला.गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या जागतिक क्रमवारीमध्ये सिंधूची एका स्थानाने घसरण झाली आणि ती तिसºया स्थानी आली. मात्र, याचा तिच्या कामगिरीवर काहीच परिणाम झाला नाही. सिंधूने ३९ मिनिटांमध्ये विजय निश्चित करताना ओहोरीला २१-१४, २१-१७ असे सहजपणे नमवले. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना सिंधूने बाजी मारली. आता, पुढच्या फेरीत सिंधूपुढे जपानच्याच पाचव्या मानांकित अकाने यामागुची हिचे तगडे आव्हान असेल.दुसरीकडे झालेल्या लढतीत सायनाला पराभवाचा सामना करावा लागला. तीन गेमपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत चीनच्या युफेई चेनने सायनाला १८-२१, २१-१९, २१-१० असा धक्का दिला.पुरुष गटात भारताचे आव्हान संपुष्टात आले. अव्वल खेळाडू के. श्रीकांतच्या अनुपस्थितीमध्ये भारताच्या आशा सध्या फॉर्ममध्ये असलेल्या एच. एस. प्रणॉयवर टिकून होत्या. मात्र, ५४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात प्रणॉयचा जपानच्या काजुमासा साकाईविरुद्ध २१-११, १०-२१, १५-२१ असा पराभव झाला. प्रणॉयलाही चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात यश आले नाही. (वृत्तसंस्था)
सिंधूची घोडदौड कायम, सायनाचे आव्हान संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 3:34 AM