सिंगापूर : पी.व्ही. सिंधू श्निवारी सिंगापूर ओपनच्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात माजी विश्वविजेती नोजोमी ओकुहारा हिचे आव्हान परतवून लावण्यात अपयशी ठरली. तिच्या या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आले.रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती सिंधू एकतर्फी लढतीत तिसरी मानांकित जपानच्या ओकुकाराकडून ७-२१, ११-२१ ने पराभूत झाली. मागच्या दोन सामन्यात सिंधूने ओकुहारावर विजय नोंदविला होता. मात्र या पराभवामुळे जय- पराजयाचे अंतर ७-६ असे झाले. या दोन खेळाडूंदरम्यान २०१७ च्या विश्व चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ११० मिनिटे रंगला होता. बॅडमिंटनच्या इतिहासात महिला एकेरीच्या सर्वोत्कृष्ट लढतींपैकी ती एक लढत मानली जाते. या मॅरेथॉन अंतिम सामन्यानंतर सिंधू-ओकुहारा सहावेळा परस्परांपुढे आल्या. सिंधूने त्यात चारवेळा बाजी मारली. (वृत्तसंस्था)>शनिवारी मात्र सिंधू पूर्णपणे आॅफफॉर्म जाणवली. सामन्यात १५ मिनिटानंतर तिने अनेक चुका केल्या. त्यातच पहिला गेम गमवावा लागला.आता ओकुहाराची लढत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली चायनीज तैपईची वाय जू यिग हिच्याविरुद्ध होईल. जू यिगने अकाने यामागुचीवर १५-२१, २४-२२, २१-१९ ने विजय साजरा केला.
सिंधू उपांत्य फेरीत ओकुहाराकडून पराभूत, सिंगापूर ओपन बॅडमिंटन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 2:47 AM