ओडेंसे : डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेची सुरुवातीची फेरी भारतासाठी मिश्र यशाची राहिली. एकिकडे स्टार खेळाडू ‘फुलराणी’ सायना नेहवालने आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिना मरिनला नमवले. दुसरीकडे, स्पर्धेतील संभाव्य विजेती असलेल्या पी. व्ही. सिंधूला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.गत महिन्यात झालेल्या जपान ओपन स्पर्धेतही दुसºया फेरीत सिंधूला आपला गाशा गुंडाळावा लागला होता. दुसरीकडे, ग्लास्गो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पटकावणाºया सायनाने अप्रतिम खेळाच्या जोरावर बलाढ्य मरिनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत सायनाने मरिनचे तगडे आव्हान २२-२०, २१-१८ असे परतावले. पुढील फेरीत सायनापुढे थायलंडच्या नितचांव जिंदपोल आणि रशियाच्या इवगेनिया कोसेत्सेकाया यापैकी एकीचे आव्हान असेल.भारतासाठी अत्यंत अनपेक्षित निकाल मिळालेल्या सामन्यात सिंधूला जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या चीनच्या चेन यूफे हिने ४३ मिनिटे रंगलेल्या सामन्यात २१-१७, २३-२१ असा धक्का दिला. विशेष म्हणजे कोरिया ओपन जिंकल्यानंतर कोणत्याही स्पर्धेत सिंधू सलग दुसºयांदा सुरुवातीच्या फेरीतच पराभूत झाली आहे.पुरुषांमध्ये किदाम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी भारतासाठी विजयी सुरुवात केली. मात्र, अन्य एका लढतीत बी. साई प्रणीतला सलामीलाच पराभवाचा सामना करावा लागला. (वृत्तसंस्था)
सिंधूचा अनपेक्षित पराभव, डेन्मार्क ओपन बॅडमिंटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 1:06 AM