सोल, दि. 17 : ऑलिम्पिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूनं कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. अंतिम सामन्यात भारताच्या 22 वर्षीय पी. व्ही. सिंधूने जपानची प्रतिस्पर्धी खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 22-20, 11-21, 21-18 अशा फरकानं पराभव केला. सिंधूसाठी अंतिम सामना आव्हानात्मक होता. कारण पहिला सेट 22-20 अशा फरकानं जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये नोझोमीनं दमदार पुनरागमन करत सिंधूचा 11-21 असा पराभव केला होता. दुसऱ्या गेममध्ये नोझोमीनं सिंधूला खेळात परतायला संधीच दिली नाही. एकवेळ हा सामना सिंधू गमावणार असे वाटत होत. पण निर्णायक आणि अंतिम गेममध्ये सिंधूनं चांगला खेळ केला. अंतिम गेममघ्ये नोझोमीनं तिला कडवा संघर्ष दिला.
यापूर्वी नोझोमी ओकुहारानं विश्व चॅम्पियनशिपमध्ये सिंधूचा पराभव केला होता. ऑलिम्पिक कांस्यपदकविजेती ओकुहारा हिने जगातील दुस-या क्र्रमांकाची अकाने यामागुची हिचा २१-१७, २१-१८ ने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. पण कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामन्यात सिंधून नोझोमीचा पराभव करत हिशेब चुकता केला.
जागतिक बॅडमिंटनमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या सिंधूनं गेल्या वर्षी चायना सुपर सिरिज जिंकली होती. सत्राच्या सुरुवातीलाच इडिया सुपर सिरिज आणि सय्यद मोदी ग्रांप्री किताबही तिने पटकाविला होता. उपांत्या सामन्यात सिंधूने चीनच्या ही बिंगजियाओ हिचा पराभव करीत कोरिया ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये धडक दिली होती.