- आकाश नेवेचेन्नई - चेन्नई स्मॅशर्सची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने महिला एकेरीच्या सामन्यात बंगळुरू ब्लास्टर्सच्या क्रिस्टी ग्लिमर हिचा १५-९, १५-१४ असा पराभव केला. मात्र सिंधूला मिश्र दुहेरीमध्ये पराभव पत्करावा लागला. सोमवारी सायंकाळी येथिल जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये पार पडलेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या सामन्यात स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू हिने क्रिस्टी ग्लिमर हिला महिला एकेरीच्या सामन्यात पराभूत करत आपल्या संघाला दोन गुणांची आघाडी मिळवून दिली. पहिल्या गेममध्ये ग्लिमर हिने ३-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र सिंधू हिने आपला दमदार खेळ करत तिला मागे टाकले आणि विजय मिळवला. दुसरा गेम चुरशीचा ठरला सिंधू हिने १४-१३ असा मॅचपॉईंट मिळवल्यावर ग्लिमर हिने दमदार स्मॅशच्या जोरावर गुण मिळवला आणि बरोबरी साधली. सिंधूने अखेरचा गुण घेत विजय मिळवला. पुरूष दुहेरीच्या सामन्यात चेन्नई स्मॅशर्सच्या बी. सुमित रेड्डी आणि ली यांग यांनी बंगळुरूच्या माथियास बोई आणि किम सा रांग यांना ८-१५, १५-१४, १५-१३ असे पराभूत केले.पुरूष एकेरीच्या पहिल्या सामन्यात विश्व रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या बंगळुरूच्या व्हिक्टर अॅक्सेलसेन याने चेन्नईच्या तान्सोंगास्क साएनसोमबुनुस्क याला १५-११,६-१५,१५-९ असे पराभूत केले. दुसऱ्या पुरूष एकेरीच्या सामन्यात बंगळुरूच्या शुभांकर डे याने चेन्नईच्या ब्रायस लेव्हरडेज् याच्यावर १५-१२,१५-१२ असा विजय मिळवत खळबळ उडवून दिली. मिश्र दुहेरीत मात्र सिंधूला पराभव स्विकारावा लागला. बंगळुरूच्या किम सा रांग आणि सिक्की रेड्डी यांनी चेन्नईच्या ख्रिस अॅडकॉक आणि पी.व्ही. सिंधू यांना १५-१४,१५-११ असे पराभूत केले.
एकेरीत पी. व्ही. सिंधूचा विजय, मिश्र दुहेरीत मात्र सिंधू पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 11:26 PM