टोकियो : आॅलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांचा जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत सरळ गेममध्ये पराभव होताच गुरुवारी दोघींना स्पर्धेबाहेर व्हावे लागले. दुसरीकडे किदाम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणय यांनी पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.स्थानिक खेळाडू आणि जेतेपदाची प्रबळ दावेदार, विश्व चॅम्पियन ओकुहाराविरुद्ध तिसºयांदा खेळणाºया सिंधूला सर्वोत्कृष्ट खेळ करता आला नाही. अनेक चुकांचा फटका बसताच सिंधूचा ४७ मिनिटांत एकतर्फी लढतीत १८-२१, ८-२१ ने पराभव झाला. या दोघींमध्ये मागचा सामना ११० मिनिटे रंगला होता. त्या सामन्यातील संघर्ष आज दिसलाच नाही. त्याआधी कोरिया ओपनमध्ये सिंधूने ८३ मिनिटांचा थरार जिंकताना ओकुहाराचा पराभव करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.लंडन आॅलिम्पिकची कांस्य विजेती सायना पाचवी मानांकित आणि आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिनविरुद्ध सुरुवातीला १४-१० आणि दुसºया गेममध्ये ६-४ अशा आघाडीनंतर १६-२१, १३-२१ अशा फरकाने पराभूत झाली. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने हाँगकाँगचा हू यून याच्यावर अर्ध्या तासात २१-१२, २१-११ ने विजय नोंदविला. यंदा इंडोनेशिया आणि आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळविणाºया श्रीकांतला आता विश्व चॅम्पियन बनलेला डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसन याच्यावर विजय नोंदविण्याचे आव्हान असेल. दोघांमधील जय-पराजयाचा रेकॉर्ड २-२ असा आहे. श्रीकांतने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यानंतर व्हिक्टरने मागील दोन्ही लढतीत विजय नोंदवीत पराभवाची परतफेड केली आहे.अमेरिकन ओपन चॅम्पियन एच. एस. प्रणय याने पुरुष एकेरीत चायनीज तायपेईचा सू जेन हाओ याचा २१-१६, २३-२१ ने पराभव केला. यानंतर त्याला दुसरा मानांकित चीनचा शी युकी याच्याविरुद्ध खेळायचे आहे. जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानावर असलेल्या शी याने अन्य सामन्यात सय्यद मोदी आंतरराष्टÑीय बॅडमिंटन विजेता समीर वर्मा याचे आव्हान १०-२१, २१-१७, २१-१५ ने मोडित काढले.अश्विनी पोनप्पा-सात्त्विक साईराज रंकीरेड्डी यांनी मिश्र प्रकारात इंडोनेशियाची जोडी प्रवीण जॉर्डन-देवी सुसांतो यांना आव्हान दिले. पण एक तास सहा मिनिटे चाललेल्या संघर्षात भारतीय जोडीला २७-२९, २१-१६, १२-२१ असे पराभवाचे तोंड पाहावे लागले. (वृत्तसंस्था)
श्रीकांत, प्रणय उपांत्यपूर्व फेरीत, जपान ओपन बॅडमिंटन; सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 4:21 AM