नवी दिल्ली : नागपुरात तीन दिवसांआधी संपलेल्या सिनियर राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य सामन्याच्या वेळी स्नायूदुखीचा त्रास झाल्याने विश्वक्रमवारीत दुस-या स्थानावर असलेला बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याला चायना ओपनमधून माघार घ्यावी लागली. आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर तो हाँगकाँग सुपरसिरिजमध्ये खेळताना दिसेल. या स्पर्धेद्वारे अव्वल स्थान पटकाविण्याची त्याच्याकडे संधी असेल.सध्या दुस-या स्थानावर असलेला श्रीकांत १४ नोव्हेंबरपासून सुरू होणा-या चायना ओपनमध्ये खेळणार नाही. नागपुरात त्याच्या मांसपेशी ताणल्या गेल्या. सातत्याने खेळत असल्यामुळे त्रास वाढला. पूर्ववत होण्यास एक आठवडा लागेल, असे श्रीकांतचे मत आहे. राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन खेळाडूंसोबत सल्लामसलतीनंतरच करण्यात आले. श्रीकांतला राष्ट्रीय स्पर्धेत त्रास झाला, हा योगायोग म्हणावा लागेल, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेने म्हटले आहे. बीएआयचे महासचिव अनुप नारंग म्हणाले, ‘श्रीकांतच्या जखमेस राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन कारणीभूत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल.(वृत्तसंस्था)
स्नायूदुखीमुळे श्रीकांतची चायना ओपनमधून माघार, विश्रांती घेतल्यानंतर हाँगकाँग सुपरसिरिजमध्ये दिसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 3:27 AM