जकार्ता : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आपल्या नव्या मोसमाची सुरुवात मंगळवारपासून सुरु होत असलेल्या इंडोनेशिया मास्टर्सच्या माध्यमातून करणार आहे. दुसरीकडे सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहेत. दुसरे मानांकनप्राप्त सिंधूने गेल्या मोसमात राष्ट्रकुल, आशियन गेम्स व विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावल्यानंतर विश्व टूर फायनल्समध्ये जेतेपदाचा मान मिळवला होता.प्रीमिअर बॅडमिंटन लीग खेळल्यानंतर ती गेल्या आठवड्यात मलेशियन मास्टर्समध्ये सहभागी झाली नव्हती. आता ती आपल्या मोहिमेची सुरुवात आॅलिम्पिक माजी सुवर्णपदक विजेता चीनची ली शुरुईविरुद्ध बुधवारी करणार आहे. हैदराबादच्या या २३ वर्षीय खेळाडूची उपांत्यपूर्व फेरीत गाठ आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मारिनसोबत पडू शकते.मलेशियन मास्टर्समध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या सायनाला पहिल्या फेरीत क्वालिफायरच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिच्यापुढे जपानच्या अकाने यामागुचीचे आव्हान राहण्याची शक्यता आहे. मलेशियामध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणाºया श्रीकांतला पहिल्या फेरीत मलेशियाच्या लियू डारेनविरुद्ध खेळावे लागेल.भारताचे समीर वर्मा, बी. साई प्रणीत व एच.एस. प्रणय हे सुद्धा या स्पर्धेत सहभागी होत आहेत. समीरने गेल्या मोसमात स्विस ओपन, हैदराबाद ओपन व सैयद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. त्याने विश्व टूर फायनल्ससाठी पात्रता मिळवताना उपांत्य फेरी गाठली होती.प्रणीतला गेल्या मोसमात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, पण पीबीएलमध्ये त्याला सूर गवसला. फिटनेसच्या समस्येनंतर प्रणय पुनरागमन करीत आहे. आॅलिम्पिक २०२० चे क्वालिफिकेशन एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे सर्वांची नजर चांगली कामगिरी करण्यावर केंद्रित झाली आहे.समीरला पहिल्या फेरीत लिन डॅनच्या, तर प्रणितला आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंगच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. प्रणयची लढत चिनी ताइपेच्या चोऊ तियेन चेनसोबत होईल. (वृत्तसंस्था)>दुहेरीत खडतर आव्हानपुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकिरेड्डी व चिराग शेट्टी यांची लढत मनू अत्री व बी. सुमित रेड्डी यांच्यासोबत होईल. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांची गाठ थायलंडच्या जोंगकोलपान के व रविंडा प्राजोंगजई यांच्यासोबत होईल. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा व सिक्की यांची लढत इंडोनेशियाच्या टी.अहमद व लिलयाना एन. यांच्यासोबत होईल.
श्रीकांत, सायना यांच्यावर भारताची मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 4:16 AM