बँकॉक - जपानची नोझोमी ओकुहारा आणि भारताची पी. व्ही. सिंधू यांच्यातील थायलंड ओपन वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम लढत तंदुरूस्तीचा कस पाहणारी ठरली. विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ओकुहाराने यात वर्चस्व राखताना 21-15, 21-18 असा विजय मिळवत जेतेपद नावावर केले. 2012 मध्ये भारताच्या सायना नेहवालने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर या स्पर्धेतील महिला एकेरीतील भारताची जेतेपदाची पाटी कोरीच राहिली. जय-पराजयाच्या शर्यतीत 5-5 असे समसमान असलेल्या ओकुहारा आणि सिंधू यांच्यातील पहिला गेम ओकुहाराने जिंकला. 2-2 अशा बरोबरीनंतर ओकुहाराने आक्रमक खेळाला सुरूवात केली. तिने नेट जवळील खेळ करताना 6-2 अशी आघाडी घेतली. सिंधूने जोरकस स्मॅश लगावत ही पिछाडी 5-6 अशी कमी केली, परंतु ओकुहाराने सातत्याने आक्रमक पवित्रा घेत आघाडी कायम राखली. 17-15 अशा आघाडीनंतर ओकुहाराने सिंधूला एकही गुण घेऊ दिला नाही आणि तिने हा गेम 21-15 असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. सिंधूने दुस-या गेममध्ये स्मॅश आणि लांब फटके मारताना 6-2 अशी आघाडी घेतली. ओकुहारानेही स्मॅशचा सुरेख खेळ करताना गेममध्ये कमबॅक केले. सहाव्या गुणासाठी 36 फटक्यांची रॅली झाली आणि त्यात ओकुहाराने बाजी मारताना गेम 6-6 असा बरोबरीत आणला. दोन्ही खेळाडूंनी कोर्टला व्यापून टाकणारा खेळ केला. सिंधूने तिरप्या फटक्यांवर, तर ओकुहाराने नेट जवळील खेळावर भर दिला. ओकुहारा सामना जिंकण्यासाठी, तर सिंधू आव्हान वाचवण्यासाठी चतुरस्र खेळ करत होती. त्यामुळे एकेका गुणासाठी प्रचंड चुरस पाहायला मिळाली. ओकुहाराने टोलावलेला शटल रेषेबाहेर जात असल्याचे समजून सिंधू वारंवार त्याला प्रत्यूत्तर देण्यास टाळत होती आणि तिचे बहुतांश अंदाज चुकल्याने ओकुहाराला फायदा झाला. हा गेम 9-11 अशा पिछाडीवरून ओकुहाराने 15-14 अशा आघाडीसह चुरशीचा केला. ओकुहाराने स्मॅश लगावताना सिंधूच्या शरीरावर परतीची फटका ठेवण्याचा खेळ केला. सिंधूने 14-17 अशा पिछाडीवरून समाना 16-17 असा आणला, ओकुहाराने सुरेख खेळ केला. गेम 18-16 अशा ओकुहाराच्या पारड्यात असताना दोघींमध्ये लाँगेस्ट रॅलीचा खेळ झाला. त्यात सिंधूने वर्चस्व गाजवले. ओकुहाराने 20-18 अशा आघाडीसह मॅच पॉईंट घेतला आणि 21-18 अशा फरकाने हाही गेम जिंकला.