बँकॉक - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने थायलंड खुल्या वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्कावर 23-21, 16-21, 21-9 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाच्या सामन्यात तिला जपानच्या नोझोमी ओकुहाराचा सामना करावा लागणार आहे.
जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या सिंधूला पहिल्या गेमपासून कडवा संघर्ष करावा लागला. मारिस्काने 11-7 अशी आघाडी घेत सामन्यावर पकड बनवली होती. मात्र, सिंधूच्या मजबूत निर्धारासमोर तिला फार काळ आघाडीचा आनंद लुटता आला नाही. मारिस्काने 2-3 गुणांची आघाडी कायम राखली होती. 16-16 अशा बरोबरीनंतर सिंधूने सामन्यावर पकड घेतली. मारिस्काला एक गेम पॉईंट मिळाला होता, परंतु सिंधूने तिला गेम घेऊ दिला नाही. 27 मिनिटांच्या पहिल्या गेममध्ये सिंधूने 23-21 अशी बाजी मारली. दोन्ही खेळाडूंनी नेट प्लेसिंगचा सुरेख खेळ केला. स्मॅश मारण्यापेक्षा उंचीने कमी असलेल्या मारिस्काने नेट जवळील फटक्यांचा कल्पकतेने वापर केला. मारिस्काने न खचता सिंधूला दुस-या गेममध्ये हार मानण्यास भाग पाडले. मारिस्काने 5-9 अशा पिछाडीनंतर उत्तम खेळ करताना गेम 9-9 असा बरोबरीत आणला. त्यानंतर मारिस्काने मुसंडी मारताना 16-10 अशी आघाडी घेतली. सिंधूने त्यानंतर सहा गुणांची कमाई केली, परंतु मारिस्काने अवघ्या 19 मिनिटांत हा सेट 21-16 असा घेत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.तिस-या गेममध्ये सिंधू नेहमा दडपणात खेळते आणि त्याचाच फायदा उचलण्याची रणनिती मारिस्काने आखली होती. मात्र, सिंधूने जोरकस स्मॅश लगावले. नेट प्लेसिंगचा मोह यावेळी तिने टाळला आणि इंडोनेशियाच्या खेळाडूला संपूर्ण कोर्टवर खेळण्यास भाग पाडले. मात्र, सिंधूने केलेल्या अनफोर्स एररचा फायदा उचलत मारिस्काने सामन्यातील संघर्ष कायम राखला होता. सिंधूने 14-7 अशा आघाडीसह विजयाकडे कूच सुरूच ठेवली होती. सिंधूने स्मॅशींगचा खेळ कराताना हा गेम 21- 9 असा सहज जिंकला.