नवी दिल्ली : फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीमध्ये भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने श्रीमंत खेळाडूंच्या यादीत सातवा क्रमांक पटकावला आहे. या यादीमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे ते अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटूसेरेना विल्यम्सने. या यादीमध्ये पहिल्या सहा श्रीमंत महिला खेळाडू या टेनिस या खेळातील आहे. टेनिस व्यतिरीक्त अन्य खेळांचा विचार केला तर सिंधू ही सर्वात श्रीमंत महिला खेळाडू ठरू शकते.
भारतातील महिला खेळाडूंच्या यादीत सिंधू अव्वल स्थानावर आहे. कारण आतापर्यंत बऱ्याच स्पर्धांमध्ये तिच्याएवढी चांगली कामगिरी कुणाला करता आलेली नाही. त्यामुळेच तिला जाहिरातीही जास्त मिळत आहेत. सध्याच्या घडीला सिंधूकडे दहापेक्षा जास्त जाहिराती आहेत. या जाहिरातींमधून सिंधूने एका वर्षात जवळपास 56 कोटी रुपये कमावले आहेत, त्याचबरोबर मानधन आणि बक्षिस यांची रक्कम जवळपास साडे तीन कोटी रुपये एवढी आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात सिंधूने जवळपास 59 कोटी रुपये कमावले आहेत.
फोर्ब्सच्या श्रीमंत महिला खेळाडूंच्या यादीमध्ये सेरेना अव्वल स्थानी असून तिची एका वर्षांतील मिळकत 102 कोटी रुपये एवढी आहे.