हो ची मिन्ह सिटी : ऋत्विका शिवानी गाडे आणि लक्ष्य सेन या भारतीय शटलर्सनी शानदार कामगिरी करताना व्हिएतनाम ओपन ग्रां. प्री. बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दोघांनीही आपापल्या सामन्यात सरळ दोन गेममध्ये बाजी मारून शानदार विजय मिळवला.गतवर्षी झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केलेल्या ऋत्विकाने चिनी-तैपईच्या वान यी तांगला सरळ दोन गेममध्ये २१-१५, २१-१२ असे लोळवत दिमाखात आगेकूच केली. उपांत्यपूर्व फेरीत ऋत्विकापुढे इंडोनेशियाच्या तृतीय मानांकीत दिनार द्याह आयुस्टिनचे कडवे आव्हान असेल. अन्य लढतींमध्ये भारताच्या पदरी निराशा पडली. परदेशी श्रेयांशी आणि वृषाली घुमांडी या युवा खेळाडूंना उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तीन गेमपर्यंत रंगलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात परदेशीला अयुस्टिनविरुध्द ६-२१, २१-१६, २१-२३ असे पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे, वृषालीला चीनी तैपईच्या सहाव्या मानांकीत चेन सू यू हिने २१-८, १२-२१, २१-१२ असे नमवले.दुसरीकडे, पुरुष गटात लक्ष्यने विजयी आगेकूच कायम राखली. त्यानेही सरळ दोन गेममध्ये सहज बाजी मारताना थ्रोंग थान्ह लाँग याचा २१-१४, २१-१२ असा धुव्वा उडवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर जपानच्या कोडाई नारोकाचे आव्हान असेल. त्याचप्रमाणे, पुरुष दुहेरी गटात भारताच्या अर्जुन एम. आर. आणि रामचंद्रन श्लोक या पाचव्या मानांकीत जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना लोव हाँग यी - मस्तान जिन्ना या मलेशियाच्या जोडीचा १४-२१, २१-१२, २१-१२ असा पाडाव केला. पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय जोडीने जबरदस्त पुनरागम करताना मलेशियन जोडीला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.
व्हिएतनाम बॅडमिंटन : ऋत्विका, लक्ष्य यांची विजयी आगेकूच, दोघांचाही सहज विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:46 AM