मुंबई : विप्लव कुवळे याने जबरदस्त कामगिरी करताना ग्रेटर मुंबई डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावत तिहेरी जेतेपद पटकावले. त्याचवेळी करीना मदनने महिला एकेरीत, तर अक्षया वारंग-अनघा करंदीकर यांनी महिला दुहेरीत बाजी मारली.दी ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीबीएमए) आणि क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेत विप्लवने तीन जेतेपदांची कमाई करत आपला दबदबा राखला. त्याने पुरुष एकेरीत अव्वल मानांकित निगेल डीसूझा याचा २१-१४, ९-२१, २१-१८ असा पराभव करत जेतेपद पटकावले. पहिला गेम जिंकल्यानंतर विप्लवला पुढच्या गेममध्ये निगेलकडून कडवा प्रतिकार मिळाला. यावेळी निगेलने जबरदस्त पुनरागमन करताना मोठ्या फरकाने बाजी मारत सामना अंतिम गेममध्ये नेला. मात्र, यावेळी विप्लवने याआधी केलेल्या चुका टाळताना मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना निगेलचे कडवे आव्हान परतावले.यानंतर पुरुष दुहेरीमध्ये विप्लवने फिरोझ मुलानी याच्यासह खेळताना निहार केळकर-सिद्धेश अरोसकर यांचा २१-१९, २२-२० असा सरळ दोन गेममध्ये पाडाव केला. मिश्र दुहेरीतही हेच सातत्य कायम राखताना विप्लवने अक्षया वारंगसह खेळत अनघा करंदीकर - सिद्धेश राऊत यांना २१-१५, २१-१२ असे सहजपणे पराभूत केले आणि तिहेरी जेतेपद उंचावले.>महिलांमध्ये करीनाचे वर्चस्वमहिला एकेरीमध्ये करीना मदन हिने लौकिकास साजेशी कामगिरी करताना सामीआ शाह हिला २१-१५, २१-६ असे पराभूत करत दिमाखात जेतेपद पटकावले. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात अक्षया-अनघा या बलाढ्य जोडीने अपेक्षित जेतेपद उंचावत इशानी सावंत-सानिया शिवलकर यांचा २१-१२, २२-२० असा पराभव केला.
विप्लवचे तिहेरी जेतेपद, महिला गटात करीना मदनची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 5:09 AM