हैदराबाद: पी.व्ही. सिंधूच्या रूपाने भारतात पहिल्या विश्व चॅम्पियनशिपच्या जेतेपदाचा जल्लोष साजरा होत असताना राष्टÑीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी मात्र खेळाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘देशात प्रशिक्षकांवरवर पुरेशी गुंतवणूक करण्यात आलेली नाही,’ असे गोपीचंद यांना वाटते.
आॅलिम्पिक रौप्य विजेती सिंधूने रविवारी भारतासाठी पहिले जागतिक अजिंक्यपद जिंकले. गोपीचंद यांच्यामते, ‘वेगाने पुढे येणाऱ्या प्रतिभांचा सांभाळ करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रशिक्षक नाहीत, हे तथ्य स्वीकारावेच लागेल.’ मंगळवारी रात्री सिंधूच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत गोपीचंद म्हणाले,‘आम्ही प्रशिक्षकांवर पुरेशा प्रमाणात गुंतवणूक केली नाही.’
द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त गोपीचंद यांनी सिंधू, सायना आणि श्रीकांत या चॅम्पियन खेळाडूंसह अनेक गुणी खेळाडूंच्या प्रतिभेला पैलू पाडले, हे विशेष. ते म्हणाले,‘आम्ही चांगले प्रशिक्षक घडवू शकलो नाहीत. चांगले प्रशिक्षक प्रशिक्षणातून नव्हे, तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणामधूनच घडू शकतात. ही पोकळी भरून काढण्यासाठीआम्हाला कठोर मेहनत घेण्याची गरज आहे.’ (वृत्तसंस्था)भारतीय संघासोबत सध्या द. कोरियाचे किम जी ह्यून हे विदेशी प्रशिक्षक आहेत. तरीही पुढे येत असलेल्या प्रतिभावान पिढीचा सांभाळ करण्यासाठी आणखी प्रशिक्षकांची गरज आहे. अनुभवी आंतरराष्टÑीय खेळाडूंविरुद्ध डावपेच आखण्यासाठी खेळाडूंसोबत अनुभवी प्रशिक्षकही हवे. आम्ही हे लक्ष्य गाठू शकलो नाहीत. नव्या पिढीतून हे अनुभवी प्रशिक्षक घडतील अशी मला आशा आहे. बॅडमिंटनच्या व्यस्त वेळापत्रकामुळेदेखील भारताला अधिक अनुभवी प्रशिक्षकांची गरज भासत आहे.- पुलेल्ला गोपीचंद