ललित झांबरे
सध्याचा काळ हा भारतीय बॅडमिंटनचा आणि क्रीडा क्षेत्रात भारतीय महिलांचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. सानिया, सायना, साक्षी, मिताली राज व सहकारी आणि पी.व्ही. सिंधू यशाचे नवनवे झेंडे गाडत आहेत. सिंधूचे कोरियन ओपनचे विजेतेपद ही या यशात पडलेली ताजी भर आहे. यासोबतच अॉलिम्पिक रौप्यविजेती पहिली, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तीन पदकं जिंकणारी पहिली, अॉलिम्पिक व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय या सिंधूच्या बिरुदांमध्ये कोरियन ओपन जिंकणारी पहिली या ताज्या बिरुदाची भर पडली आहे.
सिंधूच्या या ताज्या यशाची दोन वैशिष्टये दिसतात. पहिले म्हणजे तिने सकारात्मक विचार करुन केलेला खेळ आणि दुसरे म्हणजे चुका सुधारण्याची तिची तयारी. यामुळेच जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून जागतिक स्पर्धेतल्या पराभवाचे ती ऊट्टे काढू शकली. ग्लासगोला जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नोझोमी ओकुहाराकडून सिंधू 19-21, 22-20, 20-22 अशी हरली. त्यानंतर महिनाभरातच बाजी पलटवत तिने सोल इथे ओकुहारावर 22-20, 11-21, 21-18 असा विजय मिळवला.
स्कोअर बघा...फारसा फरक नाही. वेळ बघा..ग्लासगोला 110 मिनिटे आणि सोल इथे 83 मिनिटे. संघर्षाचा वेळ घटला आणि निकालही बदलला. हे कसे झाले?वास्तविक सिंधुचे वडिल रामन्ना यांच्या म्हणण्यानुसार जागतिक स्पर्धेतल्या पराभवानंतर ती नाराज होती पण या नाराजीचा परिणाम तिने खेळावर होऊ दिला नाही.
कोरियन विजेतेपदानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत सिंधूने काय म्हटलेय...ती म्हणते, " सोलला पुन्हा त्याच ओकुहाराविरुध्द अंतिम सामना खेळतांना महिनाभरापूर्वीचा जागतिक अजिंक्यपद अंतिम सामन्यातला आघाडीनंतरचा पराभव आपल्या मनातही नव्हता. त्याचा अजिबात विचार न करता मी पुढचा प्रत्येक गुण महत्त्वाचा आहे हे स्वतःला सांगत होते.दुसरा कोणताही विचार न करता शटलवर नियंत्रण राखणे महत्त्वाचे होते." याला म्हणतात सकारात्मक विचार. अशा विचारांनीच तिला दडपण न घेता खेळ करु दिला.
सिंधूच्या सकारात्मक विचारसरणीचे आणखी एक उदाहरण पहा..! ती म्हणते की सामना ओकुहाराशी असो की आणखी कुणाशी...त्याने फरक पडत नसतो. महत्त्वाचे असते ते फक्त समोरच्याला हरवून जिंकणे. त्यामुळे अंतिम लढत कुणाशी आहे याच्याने फारसा फरक पडत नाही.
सिंधूच्या यशातील दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तिची चुका सुधारण्याची आणि मेहनत घेण्याची तयारी. तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद म्हणतात, की ग्लासगोतल्या पराभवानंतर आम्हाला तयारीसाठी फारसा वेळ मिळाला नाही पण मिळाला त्या वेळेत आम्ही सिंधूच्या खेळात आक्रमकता आणण्यावर आणि ग्लासगोत ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यावर भर दिला. गोपीचंद यांच्याप्रमाणेच सिंधूला तिचे वडील, व्हॉलिबॉलपटू रामन्ना हेसुध्दा टीप देत असतात. त्यांनी निरिक्षणातून हेरलेली ओकुहाराची खेळाची शैली आणि त्यानुसार आखलेले डावपेच सिंधूला विजयी बनवणारे ठरले. जागतिक स्पर्धेवेळी रामन्ना यांनी पाहिले की, सिंधूच्या बॕकहँडवर डाऊन द लाईन ओकुहारा अधिक मारा करत होती आणि त्यानंतर चपळाईने नेटजवळ येत सिंधूला अडचणीत आणत होती. त्यामुळे ओकुहाराच्या या चाली निष्प्रभ ठरवण्यासाठी रामन्ना यांनी सिंधूला सल्ला दिला की काहीवेळा शटल बॕकहँडकडे ठेव, जेणेकरुन ओकुहारा गोंधळात पडेल की आता परतीचा फटका पुढ्यात टाकायचा की बॕकहँडला द्यायचा. सिंधूने असेच केले आणि हे डावपेच यशस्वी ठरले असे रामन्ना म्हणतात.
रामन्ना यांनीच दिलेल्या माहितीनुसार सिंधुला खेळताना मजा येते. ती खेळाचा आनंद घेते आणि म्हणूनच सरावात ती कधी थकत नाही की कंटाळत नाही. आनंद घेत खेळणे हेच त्यांच्या मते तिच्या यशाचे गमक आहे.
सिंधूचे ओकुहाराविरुध्दचे विजय -
2012 युवा आशियाई स्पर्धा 18-21, 21-17, 22-20
2016 रिओ अॉलिम्पिक 21-19, 21-10
2017 सिंगापूर ओपन 10-21, 21-15, 22-20
2017 कोरियन ओपन 22-20, 11-21, 21-18
---------------------------------------------------
सिंधुचे ओकुहाराविरुध्द पराभव -
2014 हाँगकाँग ओपन 17-21, 21-13, 11-21
2015 मलेशिया मास्टर्स 21-19, 13-21, 8-21
2016 आशियाई स्पर्धा 21-18, 12-21, 12-21
2017 जागतिक स्पर्धा 19-21, 22-20, 20-22