ग्लासोग, दि. 25 - भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. तिने चीनच्या सून यू वर 21-14, 21-9 असा विजय मिळवला. तिने अवघ्या 39 मिनिटात आपल्या प्रतिस्पर्ध्यांला चीत केले. या विजयासह सिंधूने तिचे ब्राँझ मेडल निश्चित केले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदक मिळवणारी ती एकमेव भारतीय आहे. यापूर्वी तिने 2013 आणि 2014 असे सलग दोनवेळा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ पदक मिळवले आहे.
भारताची दुसरी अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालही आज उपांत्यपूर्वफेरीचा सामना खेळणार आहे. तिचा सामना चीनच्या चेन युफी विरुद्ध होणार आहे. पुरुष गटात भारताचे आशा स्थान असलेल्या किंदम्बी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण कोरियाच्या सन वॅन हो ने त्याला 14-21, 18-21 असे पराभूत केले. या पराभवामुळे श्रीकांतची सलग 13 विजयाची मालिका खंडीत झाली.
रिओ ऑलिम्पिकची रौप्य विजेती भारतीय स्टार पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी गुरुवारी येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली होती. हाँगकाँगची चेयुंग नागन यी हिचा सिंधूने १९-२१, २३-२१, २१-१७ अशा फरकाने पराभव केला. अतिशय चुरशीचा हा सामना तब्बल १ तास २७ मिनिटे रंगला. २२ वर्षांच्या सिंधूने पहिला गेम १९-२१ असा गमविल्यानंतर दुसºया गेममध्ये १३-१६ अशा पिछाडीवरून मुसंडी मारली. सिंधूचे परतीचे फटके फारच सुरेख होते. अनेकदा तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला चकवित अनुभवाचा परिचय दिला.
श्रीकांतचा सामना अव्वल स्थानावर असलेला कोरियाचा सोन वान हो याच्याविरुद्ध होता. वान हो याच्याविरुद्ध श्रीकांतच्या विजयाचा रेकॉर्ड ४-४ असा होता. यंदा जून महिन्यात इंडोनेशिया तसेच आॅस्ट्रेलिया ओपन दरम्यान श्रीकांतने होवर विजय नोंदविला होता. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोडीला डेबी सुसांतो-प्रवीण जॉर्डन या इंडोनेशियाच्या जोडीकडून २२-२०, १६-२१, १६-२१ ने पराभवाचे तोंड पहावे लागले.