नांनजिंग (चीन) - भारताच्या सायना नेहवालला जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. स्पनेच्या कॅरोलिन मरिनने अवघ्या 31 मिनिटांत सरळ गेममध्ये सायनावर विजय मिळवला. मरिनने ही लढत 21-6, 21-11 अशी जिंकली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.
जागतिक स्पर्धेत 2015 मध्ये रौप्य आणि 2017 मध्ये कांस्यपदक जिंकणा-या सायनाकडून राष्ट्रकुल सुवर्णपदकानंतर येथे जेतेपदाच्या अपेक्षा होत्या. मात्र, मरिनविरूद्धच्या सामन्यात तिचा संघर्ष जाणवलाच नाही. मरिनने अगदी सहजपणे सायनाला नमवले. मरिनने जलद खेळ करताना 11-2 अशी आघाडी घेतली. सायनाने गेममध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न मरिनच्या खेळासमोर अपयशी ठरला. मरिनने 12 मिनिटांत हा गेम 21-6 असा घेतला.
दुस-या गेममध्ये सायना सुरूवातीचे गुण घेतले, परंतु मरिनच्या झंझावातासमोर तिला फार काळ तग धरता आले नाही. मरिनने दमदार स्मॅशचा खेळ करताना 11-8 अशी आघाडी घेतली. मरिनने 19 मिनिटांत हाही गेम 21-11 असा जिंकून सायनाचे आव्हान संपुष्टात आणले.