नानजिंग (चीन) : जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचा तिसरा दिवस भारतीयांसाठी निराशाजनक राहीला. एकापाठोपाठ एक खेळाडूंचे आव्हान संपुष्टात येत असताना ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणित यांच्या विजयाने भारतीयांच्या चेह-यावर स्मिथ फुलवले. स्पर्धेच्या सकाळच्या सत्रात किदम्बी श्रीकांतने विजयी धडाका कायम राखला होता.
रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या सिंधूने बुधवारी इंडोनेशियाच्या फित्रीयानीचे आव्हान 21-14, 21-9 असे सहज परतवले. तिने पहिला गेम अवघ्या 15 मिनिटांत 21-14 असा जिंकून आघाडी घेतली. हा गेम 4-4 असा बरोबरीत असताना सिंधूने जबरदस्त स्मॅश लगावले आणि 17-7 अशी आघाडी वाढवली. त्यानंतर फित्रीयानीने 5 गुण घेत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण, जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या सिंधूने हा गेम जिंकला.
जागतिक स्पर्धेत दोन कांस्य ( 2013 व 2014) आणि एक रौप्यपदक ( 2017) जिंकणा-या सिंधूच्या आक्रमक खेळासमोर इंडोनेशियाची खेळाडू निष्प्रभ झालेली पाहायला मिळाली. त्याचाच फायदा उचलत सिंधूने हाही गेम 21-9 असा जिंकला आणि विजयी सलामी दिली.