नानजिंग (चीन) : येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची स्टार शटलर पी.व्ही सिंधूने आज जपानच्या नोजोमी ओकुहरावर सरळ गेममध्ये विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे.सिंधूने ५८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात २१-१७,२१-१५ असा विजय मिळवला. तिचा पुढचा सामना दुसऱ्या मानांकित अकाने यामागुचीसोबत होईल. या लढतीत दोन्ही गेममध्ये ओकुहराने आघाडी घेतली. मात्र सिंधूने पुनरागमन करत विजय मिळवला.या विजयासह सिंधूने पदक निश्चित केले आहे. तिचे विश्व चॅम्पियनशिपमधील हे चौथे पदक असेल. या आधी तिने दोन कांस्य आणि एका रौप्यपदकाची कमाई केली आहे. सिंधू या स्पर्धेत गतविजेती राहिली आहे.‘फुलराणी’ सायना नेहवालचे आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. दोन वेळेची चॅम्पियन, आॅलिम्पिक सुवर्ण विजेती स्पेनची कॅरोलिना मरिनने सायनाचा ६-२१, ११-२१ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. संपूर्ण सामन्यात कॅरोलिनाचे वर्चस्व दिसून आले. सायनाची दमछाक पाहायला मिळाली. उपांत्य फेरीत कॅरोलिनाची लढत बिंगजाओशी होणार आहे.मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सात्त्विक साईराज रंकीरेड्डी तसेच पुरुष गटात बी साई प्रणित या भारतीयांचे आव्हान संपले. (वृत्तसंस्था)
जागतिक बॅडमिंटन : सिंधू उपांत्य फेरीत, सायनाला पराभवाचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 3:26 AM