ग्वांग्झू : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सच्या ‘अ’ गटातील लढतीत शुक्रवारी येथे सलग तिसरा विजय नोंदवत बाद फेरी गाठली. दुसरीकडे या स्पर्धेसाठी प्रथमच पात्र ठरलेल्या समीर वर्माने ‘ब’ गटात आपली अखेरची लढत जिंकत बाद फेरीत धडक मारली.सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सिंधूने शुक्रवारी येथे जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानी असलेल्या बेवेन झांगचा एकतर्फी लढतीत २१-९, २१-१५ ने पराभव केला. गेल्या वर्षी स्पर्धेत उपविजेती ठरलेली सिंधू म्हणाली,‘मी सुरुवातीला २-६ ने पिछाडीवर होती, पण सूर गवसल्यानंतर सर्वकाही सुरळीत झाले.’ तिने इंडियन ओपनच्या अंतिम लढतीत या खेळाडूविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवाची आठवण करताना म्हटले की,‘मी इंडियन ओपननंतर तिच्याविरुद्ध अनेक सामने खेळले. त्यामुळे या लढतीकडे मी एक नवी लढत म्हणून बघत होते. सलग तीन सामने जिंकल्याचा आनंद आहे. ही सकारात्मक बाब असून उपांत्य फेरीत चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.’दुसरीकडे, २४ वर्षीय समीरने कोर्टवर चपळता दाखविताना थायलंडच्या केंटाफोन वांगचारोनचा ४४ मिनिटांमध्ये २१-९, २१-१८ ने पराभव केला. समीरने जागतिक क्रमवारीत केंटो मोमताविरुद्ध पहिला सामना गमाविल्यानंतर शानदार पुनरागमन केले आणि सलग दोन सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. समीर म्हणाला,‘मी यापूर्वी त्याच्याविरुद्ध स्विस ओपनमध्ये खेळलो होतो. त्यामुळे त्याच्या खेळाची कल्पना होती. दुसºया गेममध्ये पिछाडीवर असताना प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार धैर्य कायम राखले आणि आता उपांत्य फेरीत खेळण्यासाठी सज्ज आहे. स्पर्धेत प्रथमच खेळण्याचा आतापर्यंतचा अनुभव शानदार ठरला.’ (वृत्तसंस्था)
वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन: सिंधू व समीर यांची बाद फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 4:46 AM