Natural Hair Oil : बाजारात तसे तर वेगवेगळ्या प्रकारचे तेल मिळतात. तेलांमध्ये कृत्रिम रंग आणि केमिकल्स असतात. ज्यामुळे केसांचं नुकसान होतं. अशात जर तुम्ही केसगळतीमुळे हैराण असाल आणि केस तुम्हाला वाढवायचे असतील तर घरीच तेल बनवून केसांवर लावू शकता. या नॅचरल तेलांमुळे केसांची वाढ होते आणि केसगळीही थांबते. कढीपत्ते, मेथी आणि जास्वंदच्या फुलांपासून तीन प्रकारचे तेल बनवून केसांवर लावू शकता.
कढीपत्त्याचं तेल
केसांसाठी कढीपत्ते अनेक दृष्टीने फायदेशीर असतात. कढीपत्त्यांमध्ये प्रोटीन भरपूर असतं आणि यात बीटा कॅरोटीनचं प्रमाणही भरपूर असतं. ज्यामुळे केसगळतीची समस्या दूर होते. तसेच यात भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात ज्यामुळे केसांचं नुकसान टाळता येतं. हे तेल बनवण्यासाठी खोबऱ्याचं तेल आणि काही कढीपत्यांची गरज पडेल. सगळ्यात आधी एका वाटीमध्ये खोबऱ्याचं तेल घ्या आणि त्यात मुठभर कढीपत्ते टाका. हे तेल गरम करा आणि जेव्हा पाने काळे होतील तेव्हा गॅस बंद करा. हे तेल थंड झाल्यावर केसांना लावा. याने केसांची वाढही होईल आणि पांढरे केसही काळे होतील.
जास्वंदाच्या फुलांचं तेल
जास्वंदामध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेवेनॉइड्स आणि अमीनो अॅसिडसहीत फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट्सही भरपूर असतात. जास्वंदामधील गुणांमुळे डोक्याची त्वचा मॉइश्चराइज होते आणि केसगळतीची समस्या कमी होते. इतकंच नाही तर केसांची वाढही होते. जास्वंदाच्या फुलाचं तेल बनवण्यासाठी एक कप खोबऱ्याचं तेल, त्यात १० जास्वंदाचे फूल आणि तेवढीच जास्वंदाची पाने घ्या. आधी फुलं आणि पाने स्वच्छ करून बारीक करा. त्यानंतर खोबऱ्याचं तेल गरम करा आणि त्यात जास्वंदाची पेस्ट टाका. काही वेळ गरम केल्यावर हे तेल थंड होऊ द्या. केसांना शाम्पू करण्याच्या अर्ध्या तास आधी या तेलाने केसांची मालिश करा. याने केसांची वाढ चांगली होते.
मेथीचं तेल
मेथीचे पिवळे दाणे केसांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. मेथीच्या दाण्यांमध्ये अॅंटी-फंगल आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. हे तेल केस वाढवण्यासोबतच केसांमधील कोंडाही दूर करतं. मेथीचं तेल तयार करण्यासाठी खोबऱ्याचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल कमी आसेवर गरम करा. या तेलामध्ये मेथीचे दाणे टाका. काही वेळाने गॅस बंद करा. नंतर हे तेल आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना लावून मालिश करा.