आता जवळपास सगळीकडे कमी-जास्त प्रमाणात थंडी जाणवायला लागली आहे. थंडीच्या दिवसात काही लोक आंघोळ करण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडतात तर काही लोक थंडीमुळे आंघोळीची टाळाटाळ करतात. या दिवसात सर्वात चिंतेची बाब म्हणजे त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या होणे. काही लोकांची त्वचा या दिवसात कोरडी होते. काहींच्या त्वचेला भेगाही पडतात. त्यामुळे अनेकजण आंघोळीच्या पाण्यात गुलाब जल किंवा दुधाचा वापर करतात. पण थंडीच्या दिवसात आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यावर काय फायदे होतात हे फार कमी लोकांना माहीत असेल. आज आम्ही तुम्हाला आंघोळीच्या कोमट पाण्यात मीठ टाकल्याने काय फायदे होतात हे सांगणार आहोत.
त्वचेची स्वच्छता - मिठामध्ये मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे मिनरल्स त्वचेच्या रोमछिद्रांपर्यंत जातात आणि त्वचेची चांगल्याप्रकारे स्वच्छता करतात. तसेच त्वचेला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
स्ट्रेस होतो दूर - कोमट पाण्यामध्ये मिठ टाकून आंघोळ केल्यास त्या व्यक्तीचा स्ट्रेस दूर होण्यास मदत होते. जास्त थकवा आणि स्ट्रेस असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करायला हवी.
त्वचेवर येतो ग्लो - थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करणे आरामदायक वाटत असेल तरी याने त्वचेला नुकसान होतं. त्यामुळे कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यास त्वचेवरील डाग आणि सुरकुत्याही दूर होण्यास मदत होते.
सांधेदुखीपासून आराम - थंडीच्या दिवसात अनेकांना सांधेदुखीची समस्या अधिक प्रमाणात सहन करावी लागते. अशावेळी या लोकांनी कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करावी.
त्वेचेच्या मृत पेशी होतील दूर - थंडीच्या दिवसात मृत त्वचेची समस्या ही सामान्य बाब आहे. ही मृत त्वचा दूर करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यास फायदा होऊ शकतो.