(Image Credit : leaf.tv)
जेवणाच्या ताटामध्ये दही असेल तर जेवणाचा आनंद आणखी वाढतो. पण आपण सारे जाणतोच की, दह्याचा वापर आपण सौंदर्य वाढवण्यासाठीही करतो. केस असो किंवा त्वचा सर्व समस्यांवर दही फायदेशीर ठरतं. केस मुलायम करण्यासाठी दही उत्तम कंडिशनर म्हणून काम करतं. एवढचं नाहीतर केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठीही दही अत्यंत फायदेशीर ठरतं.
साधारणतः आपण आपल्या गरजेनुसार, दही एखाद्या वाटीमध्ये घेतो आणि ते फेटून केसांना लावतो. परंतु फक्त एवढं करणं पुरेसं नसतं. जर तुम्ही केसांसाठी दह्याचा वापर करत असाल तर तुम्हाला हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे की, वेगवेगळ्या समस्यांनुसार दही वेगवेगल्या पद्धतींनी लावणं आवश्यक असतं. असं केल्यामुळे दह्याचा केसांना योग्य तो फायदा होऊन केसांच्या समस्याही दूर होण्यास मदत होते.
1. दही एक नॅचरल कंडिशनर आहे. दही एका बाउलमध्ये घेऊन ते व्यवस्थित फेटून घ्या आणि त्यानंतर संपूर्ण केसांना व्यवस्थित लावा. त्यानंतर केसांना शॉवर कॅपच्या मदतीने पूर्ण कव्हर करा. साधारणतः 30 मिनिटांसाठी असचं ठेवा. यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल, पण त्यानंतर केस मुलायम आणि शाइनी दिसण्यास मदत होईल.
(Image Credit : WebMD)
2. दही मधासोबत एकत्र करून लावणंदेखील फायदेशीर ठरतं. तुम्ही या पेस्टचा वापर मास्क म्हणूनही करू शकता. 15 ते 20 मिनिटांनी केस स्वच्छ करा. यामुळे केस फार मुलायम होण्यास मदत होते.
3. जर तुमचे केस गळत असतील किंवा दुभंगलेल्या केसांसाठीही दह्याचा मास्क केसांना लावणं फायदेशीर ठरतं. तसेच केसांची मुळं मजबुत करण्यासाठीही दह्याचा मास्क फायदेशीर ठरतो.
(Image Credit : Tate's Kitchen)
4. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा झाला असेल तर, दह्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करा. तयार पेस्ट स्काल्पवर लावा आणि काही वेळासाठी तसचं ठेवा. आठवड्यातून दोन वेळा याचा वापर केल्याने केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
5. जर तुमचे केस फार गळत असतील तर दह्यामध्ये काही कढिपत्त्याची पानं एकत्र करून पेस्ट तयार करा. केसांना लावून काही वेळाने धुवून टाका. यामुळे केस गळण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
6. केसांच्या वाढिसाठीही दही मदत करतं. दह्यामध्ये थोड्या प्रमाणात नारळाचं तेल आणि जास्वंदाची फुलाच्या काही पाकळ्या एकत्र करून तयार पेस्ट केसांना लावा. यामुळे केस वाढण्यास मदत होते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.