केसांमध्ये डॅंड्रफ म्हणजेच कोंडा होण्याची समस्या ही अलिकडे वेगाने वाढत आहे. अनेकजण हा कोंडा दूर करण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. काहींना याचा फायदाही होतो. पण काहींना या समस्येतून सुटका मिळत नाही. खरंतर कोंडा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो हे अनेकांना माहितच नसतं. जर कोंडा कशाप्रकारचा आहे हे जाणून घेऊन उपाय केले तर त्याचा अधिक फायदा होईल. अनेकांना हे माहीत नसतं की, केसांमध्ये होणारा कोंडा हा ६ प्रकारचा असतो. हा कोंडा होण्याची कारणेही वेगवेगळी असतात आणि हा कोंडा दूर करण्यासाठी उपयाही वेगवेगळे करावे लागतात. चला जाणून घेऊ केसांमध्ये होणाऱ्या कोंड्याचे प्रकार....
१) ड्राय स्कीन डॅंड्रफ
जर डोक्याची त्वचा प्रमाणापेक्षा जास्त ड्राय असेल तर त्यावर होणारा कोंडाही कोरडा असतो. हा कोंडा केसांना हात लावताच गळायला सुरुवात होते. याची दोन मोठी कारणे असतात एकतर थंडीचे दिवस आणि केस वेळेवर स्वच्छ न करणे.
२) ऑयली स्कीन डॅंड्रफ
आपली त्वचा नैसर्गिकपणे तेलची उत्पत्ती करतं. पण तेल डोक्याच्या त्वचेवर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्यानेही डॅंड्रफ होतो. हे तेल वाढण्याची अनेक कारणे असतात. अशाप्रकारचा डॅंड्रफ डोक्याच्या त्वचेला चिकटलेला असतो आणि सहजपणे निघतही नाही.
३) फंगल डॅंड्रफ
जर इन्फेक्शनमुळे डॅंड्रफ झाला असेल तर त्याला फंगल डॅंड्रफ म्हटले जाते. जर डोक्याच्या त्वचेवर अधिक तेल असेल तर त्वचेची पीएच लेव्हल बिघडल्यास याप्रकारचा डॅंड्रफ होतो. हा डॅंड्रफ पिवळ्या रंगाचा असतो आणि याने डोक्यात खाज येते.
४) कॉस्मेटिक प्रॉडक्टमुळे होणारा डॅंड्रफ
केसांवर प्रमाणापेक्षा जास्त केमिकल युक्त उत्पादनं जसे हेअर स्प्रे, क्रीम इत्यादी वस्तूंचा वापर केल्यानेही डॅंड्रफ होतो. याप्रकारच्या डॅंड्रफमुळे केसगळतीही होते.
५) सेबोरिक डर्मेटायटिस
हा एकप्रकारचा स्कीन प्रॉब्लेम आहे, ज्यामुळे डोक्यात, कानांजवळ आणि मानेजवळ वेगळ्याच प्रकारचा डॅंड्रफ येतो. हा डॅंड्रफ येण्याचं कारण तणाव आणि हार्मोन्समधील बदल हे आहे.
६) सोरायसिस
ही सुद्धा त्वचेसंबंधी समस्या आहे. याने रोगप्रतिकारशक्तीवर प्रभाव पडतो. अशावेळी एक वेगळ्याच प्रकारचा डॅंड्रफ तयार होतो आणि हा डॅंड्रफ त्वचेवर चिकटलेला असतो.
काय करता येईल उपाय?
तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य तेल आणि शॅम्पूचा वापर करा.
रोजच्या डाएटमध्ये झिंक, व्हिटॅमिन-बी आणि फॅटता समावेश करा.
केसांवर कोणत्याही प्रकारच्या केमिकल युक्त उत्पादनांचा उपयोग करु नका.
केसांना वेळेवर ब्रश आणि वॉश करा.