हिवाळ्यात प्रत्येक मुलीला शुष्क आणि कोरड्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेक उपाय, महागडी उत्पादनं यांसारखे अनेक उपाय केल्यानंतरही केसांची समस्या काही दूर होत नाही. वैतागून काहीजणी सर्व उपाय सोडून देतात. तर काहीजणी केसांच्या सौंदर्यासाठी नवनवीन उपाय करत राहतात. प्रदूषण आणि उन्हामुळे आपले केस फार डॅमेज आणि ड्राय होतात. त्यामुळे आपल्या केसांची कमी झालेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी काहीना काही उपाय करणं आवश्यक असतं.
आपल्या सर्वांना माहीत आहे की, आपल्या केसांना आपल्या स्काल्प म्हणजेच, डोक्याच्या त्वचेमधून मॉयश्चर मिळतं. परंतु, हिवाळ्यामध्ये मॉयश्चर कमी होतं. हे मॉयश्चर परत मिळवण्यासाठी तुंम्ही या उपचारांचा वापर करून आठवड्यामध्येच तुमच्या केसांनी हरवलेली चमक पुन्हा मिळवू शकता.
1. नारळाचं दूध, अवोकाडो आणि जोजोबा ऑइल
नारळाच्या दूधामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन किंवा फॅट्स असतात. यामुळे केस मुलायम होण्यासोबतच मजबुत होण्यास मदत होते. तसेच यामध्ये फॅटी अॅसिड असतं, जे केसांना पोषण देण्यासाठी मदत करतं. जोजोबा ऑइल केसांच्या वाढिसाठी मदत करतं. त्यामुळे तुम्ही या तीन गोष्टी एकत्र करून स्काल्पला लावू शकता.
2. दूध आणि मध
दूध आणि मधाचा वापर करून तुम्ही अगदी सहज हेअर मास्क तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला अर्धा कप दूध आणि दोन चमचे मधाची गरज असेल. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून आपल्या केसांना लावा. यानंतर काही वेळ हा हेअर मास्क केसांनाच लावून ठेवा. आता आपले केस शॅम्पूच्या मदतीने धुवून घ्या. यामुळे केस चमकदार होण्यास मदत होते.
3. पपईचा हेअर मास्क
जर तुम्ही कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर याचा अर्थ तुमच्या डोक्याची त्वचा फार ड्राय झाली आहे. त्यासाठी तुम्ही पपईचा वापर करून स्काल्पचा कोरडेपणा दूर करू शकता. केसांमध्ये पपईचा हेअर मास्क लावल्यामुळे केस मजबुत होण्यासही मदत होते. त्यासाठी एक पपई घेऊन तिचा गर अर्धा कप दह्यामध्ये एकत्र करा. त्यानंतर हे दोन्ही पदार्थ एकत्र करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट केसांना लावून व्यवस्थित मसाज करा. त्यानंतर तयार मिश्रण आपल्या केसांना अर्ध्या तासासाठी केसांना लावा. त्यानंतर केस शॅम्पूच्या मदतीने स्वच्छ धुवून घ्या.
4. सफरचंदाचं व्हिनेगर, मध आणि बदामाचं तेल
दोन चमचे मधामध्ये एक चमचा बदामाचं तेल एकत्र करा. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा सफरचंदाचं व्हिनेगर एकत्र करा. तयार मिश्रण आपल्या स्काल्पवर लावा. अर्धा तासासाठी ठेवून केस धुवून टाका.
जर तुम्हाला आपल्या डोक्याच्या त्वचेचं कोरडेपणापासून रक्षण करायचं असेल तर दररोज केसांना तेल लावा. यासाठी तुम्ही तेल गरम करा आणि त्यानंतर आपल्या केसांना आणि स्काल्पला मसाज करा. त्यानंतर एका तासासाठी तसचं ठेवा आणि धुवून टाका. तुम्ही गरज असेल तर ऑलिव्ह ऑइल, कॅस्टर ऑइल आणि बदामाचं तेल यांसारखी नैसर्गिक तेलांचा वापर करून आपल्या केसांची चमक परत मिळवा.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)