हृदयरोग टाळायचा? मग चला ‘वॉक’ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2016 3:49 PM
चालणे किंवा सायकलवर फेरफटका मारण्यासारख्या साध्या व्यायामानेच वयोवर्ष ६५ पुढील लोकांमध्ये हृदयविकारांमुळे मृत्यू होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी होते.
शारीरिक हालचाल आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. रोजच्या रोज ठराविक प्रमाणात आपल्या शरीराची योग्य ती हालचाल होणे अपेक्षित असते. परंतु आपल्या जीवनशैलीमुळे ते शक्य होत नाही. म्हणून संपूर्ण जगात हृदयविकार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाबामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.एका संशोधनानुसार चालणे किंवा सायकलवर फेरफटका मारण्यासारख्या साध्या व्यायामानेच वयोवर्ष ६५ पुढील लोकांमध्ये हृदयविकारांमुळे मृत्यू होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी होते. फिनलँडमधील ओऊलू विद्यापीठातील प्राध्यापक रिटा अँटिकेनेन यांनी माहिती दिली की, जे वयोवृद्ध लोक शारीरिक हालचाली करण्यात अधिक सक्रीय असतात त्यांचा स्ट्रोक किंवा हृदयविकारांमुळे मृत्यू होण्याची शक्यता इतरांपेक्षा खूप कमी असते.रिकाम्या वेळात केलेला साधा व्यायामदेखील एकंदर आरोग्यावर फार सकारात्मक परिणाम करत असतो. जेवढी जास्त शारीरिक हालचाल, तेवढे आरोग्य तंदरुस्त. या अध्ययनामध्ये ६५ ते ७४ वयोगटातील २४५६ वृद्धांचा अभ्यास करण्यात आला. सहभागी झालेल्या हे स्वयंसेवक संशोधकांना त्यांच्या दिवसभरातील फिजिकल अॅक्टिव्हिटीबद्दल माहिती देत असत.यातून जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण केले असता असे दिसून आले की, सामान्य व अति शारीरिक व्यायाम करणाºया लोकांमध्ये हार्ट अॅटकची शक्यता अनुक्रमे ३१ ते ४५ टक्क्यांनी कमी तर त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता ५४ ते ६६ टक्क्यांनी कमी आढळून आली.