आपलं सौंदर्य जपण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतं. तसेच अनेकदा त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यातल्यात्यात आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी चेहऱ्यासोबतच केसांचीही मोठी भूमिका असते. यामुळे महिलांसोबतच अनेक पुरूषही आपल्या केसांची विशेष काळजी घेताना दिसतात. पण बऱ्याचदा कितीही काळजी घेतली तरिही केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये अनेकांना प्रामुख्याने सतावणारी समस्या म्हणजे केस गळणे असून त्याची कारणही वेगवेगळी असू शकतात. केसांची काळजी न घेणं किंवा वाढतं प्रदुषणही केसांच्या गळण्यासाठी कारणीभूत ठरतं. यावर अनेक उपाय करूनही या समस्येपासून सुटका करून घेणं शक्य होत नाही. परिणामी केस गळतातच आणि डोक्याला टक्कल पडतं. अनेक लोकं विग लावून आपल्या डोक्यावरील टक्कल झाकण्याचा प्रयत्न करतात. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर आता टेन्शनला करा बाय बाय... कारण तुमच्या या समस्येवर एक तोडगा शोधण्यात आला आहे. एका संशोधनानुसार, तुमच्या डोक्यावरील गेलेले केस पुन्हा उगवता येणं शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हल्लीच न्यूयॉर्क स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी एक संशोधन केलं आहे. या संशोधनासाठी संशोधकांनी डोक्यातील Sonic Hedgehog Pathway या पेशींवर प्रक्रिया करून त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम हे संशोधन उंदरावर करण्यात आले. यातून असा निष्कर्ष समोर आला की, जेव्हा मूल आईच्या गर्भात असते त्यावेळी Sonic Hedgehog या पेशी जास्त सक्रीय असतात. यामुळे केसांजवळच्या पेशींची निर्मिती होत असल्याचे दिसून आले. पण तुम्हाला डोक्याला जखम झाली असेल किंवा वय वाढल्यावर या पेशी तयार होणं आपोआप बंद होतं. याच कारणामुळे जगभरातील वयाची पंचवीशी गाठलेल्या तरूणांचे केस गळण्यास सुरुवात होते. तर चाळीशी ओलांडल्यानंतर 40 टक्के महिलांचे केस गळण्यास सुरुवात होते.
संशोधन करण्यासाठी संशोधकांनी उंदराची खराब त्वचा आणि फायब्रोब्लास्ट नावाच्या पेशींची चाचणी केली. त्यावेळी पेशींमधून कोलेजन नावाच्या प्रोटीनचा स्त्राव होत असल्याचे दिसून आले. कोलेजन प्रोटीन आपल्या केसांना रंग आणि आकार देण्याचं काम करतं. दरम्यान संशोधक मायूमी इटो यांनी डोक्यातील Sonic Hedgehog या पेशींना सक्रिय केले असता, पेशीही सक्रिय झाल्याचे दिसून आले. त्यानंतर चारच आठवड्यांमध्ये उंदराच्या ज्या त्वचेवरील केस गळाले होते. तिथे पुन्हा नव्याने केस उगवल्याचे निदर्शनास आले. या संशोधनासंदर्भात नेचर कम्युनिकेशन जर्नलमध्ये एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या लेखामधून हा प्रयोग माणसांवरही करता येऊ शकतो असा दावा संशोधकांनी केला आहे.