उन्हाळा म्हणजे त्वचेचा दुश्मन, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. टॅनिंग, ड्रायनेस, घाम आणि प्रदूषण यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दरम्यान, ग्रीन टी या सर्व समस्यांपासून लढण्यासाठी मदत करतं. आतापर्यंत तुम्ही ग्रीन टी पिण्याच्या फायद्यांबाबत फार ऐकलं असेल आता तुम्हाला ग्रीन टीचे सौंदर्य वाढविण्यासाठीचे फायदे सांगणार आहोत.
ग्रीन टीमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात आणि हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यासाठी ग्रीन टी मिस्ट तयार करून तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. त्यामुळे निस्तेज आणि काळवंडलेल्या त्वचेच्या समस्या दूर होतात. जाणून घेऊया ग्रीन टी मिस्ट तयार करण्याची कृती...
ग्रीन-टी मिस्ट तयार करण्यासाठी एक चमचा ग्रीन टी, थोडंसं रोजहिप ऑइल आणि थोडंसं गुलाब पाण्याची गरज असेल. ग्रीन-टी मिस्ट तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये एक कप पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा ग्रीन-टी एकत्र करून घ्या. हे 10 मिनिटांपर्यंत पाण्यामध्ये उकळत ठेवा. उकळल्यानंतर हे थंड करून घ्या. त्यानंतर गाळून त्यामध्ये 2 ते 4 थेंब रोजहिप ऑइल एकत्र करून घ्या.
तयार मिश्रणामध्ये थोडसं गुलाब पाणी एकत्र करून स्प्रे बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हाही तुम्हाला स्किन ड्राय वाटेल तेव्हा डोळे बंद करा आणि चेहऱ्यावर ग्रीन-टी मिस्ट स्प्रे करा. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.