केसांचं आणि त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी बऱ्याचदा दह्याचा सल्ला देण्यात येतो. खरं तर फार पूर्वीपासूनच दह्याचा आरोग्यासोबतच सौंदर्य खुलवण्यासाठीही वापर करण्यात येतो. दह्यामध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म असून त्याबरोबर व्हिटॅमिन्सही असतात. केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ही पोषक तत्व मदत करतात. यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या आणि सतत येणारी खाज दूर होण्यास मदत करतं.
दह्यामध्ये फॅटी अॅसिड असतं. जे केस हेल्दी ठेवण्यासोबत कोरड्या आणि निस्तेज केसांची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. जर तुम्ही केस मजबुत, शायनी आणि मुलायम करायचे असतील तर दिवसातून दोन वेळा दह्यापासून तयार करण्यात आलेले हे हेअर मास्क नक्की ट्राय करा.
दह्यापासून हेअर मास्क तयार करण्याची पद्धत...
केसांतील कोंडा दूर करण्यासाठी हेअर मास्क
दह्यामध्ये असे अनेक गुणधर्म आढळून येतात जे कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया हेअर मास्क तयार करण्याची पद्धत...
साहित्य :
- एक कप दही
- 5 चमचे मेथीच्या दाण्यांची पावडर
- 1 चमचा लिंबाचा रस
असा तयार करा हेअर मास्क :
एका बाउलमध्ये सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या. ब्रशच्या मदतीने हा हेअर मास्क आपल्या केसांना लावा. त्यानंतर केस शॉवर कॅपच्या मदतीने कव्हर करा. जवळपास 40 मिनिटांसाठी राहू द्या. त्यानंतर माइल्ड हर्बल शॅम्पूच्या मदतीने धुवून टाका. उत्तम परिणामांसाठी एका महिन्यात दोन वेळा याचा वापर करा.
केसांची चमक वाढविण्यासाठी हेअर मास्क
केसांवरील धूळ, माती आणि चिकटपणा दूर करण्यासाठी हा हेअर मास्क ठरतो फायदेशीर...
साहित्य :
- एक कप दही
- जास्वंदाची फुलं
- कडुलिंबाची पानं
- संत्र्याचा रस
असा तयार करा हेअर मास्क :
जास्वंदाची फुलं आणि कडुलिंबाची पानं एकत्र करून मिक्सरमध्य बारिक करून घ्या आणि त्यामध्ये दही आणि संत्र्याचा रस एकत्र करा. आता हा हेअर मास्क आपल्या केसांवर लावून अर्ध्या तासासाठी तसचं ठेवा. त्यानंतर केस शॅम्पूच्या मदतीने धुवून घ्या.
केसांच्या मजबुतीसाठी हेअर मास्क
दही फक्त केसांना कूलिंग इफेक्ट देत नाहीतर यामध्ये इतर आणखी पदार्थ एकत्र केले तर केस मजबुत होण्यासाठी मदत होते. केस गळण्यापासून बचाव करण्यासाठी हा पॅक आठवड्यातून एकदा नक्की लावा.
साहित्य :
- एक कप दही
- 2 चमचे ऑलिव्ह ऑइल
- 3 चमचे कोरफडीचा गर
- 2 चमचे तुळशीच्या पानांची पेस्ट
- 2 चमचे कढिपत्त्याची पेस्ट
असा तयार करा हेअर मास्क :
एक बाउल घ्या आणि सर्व साहित्य एकत्र करा. आपल्या केसांच्या मुळांपासून पूर्ण केसांना हेअर मास्क लावा. हा मास्क एक तासासाठी ठेवा त्यानंतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने धुवून टाका.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)