- डॉ. केतकी गोगटे
‘फेअरनेस क्रीम’च्या खरेदी-विक्रीसाठी डॉक्टरी सल्ला आवश्यक का आहे?
भारतामध्ये गोरेपणाची क्रेझ फक्त स्त्रिया आणि मुली यांनाच आहे असं नाही तर मुलांमध्येही ती मोठ्या प्रमाणात आहे. गोरं म्हणजेच सुंदर अशा चुकीच्या कल्पनेमुळे जे मिळेल ते वापरून अनेकांना गोरं व्हायचं आहे. या खुळ्या नादापोटी लोकं वाट्टेल ते करावयास तयार आहेत.अनेक प्रकारच्या फेअरनेस क्रीममध्ये शरीरावर घातक परिणाम करणारी १४ प्रकारची स्टेरॉइड्स असतात. अशा फेअरनेस क्रीम कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय सहज विकली आणि विकत घेतली जातात.केंद्र सरकारच्या औषध तांत्रिक सल्लागार मंडळानं या अशा अनिर्बंध वापरातला धोका जाणून पावलं उचलायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारनं स्टेरॉइडयुक्त फेअरनेस क्रीमच्या सर्रास विक्री आणि खरेदीला आळा घालण्याचं ठरवलं आहे. स्टेरॉइड असलेल्या फेअरनेस क्रीम्सची डॉक्टरी सल्ल्याशिवाय विक्री आणि खरेदी करण्यावर बंदी आणणार आहे.सुंदरतेसाठी गैरवापरस्टेरॉइड हार्मोन्सचा आणि खासकरून स्टेरॉइडयुक्त मलमांचा शोध लागल्यावर त्वचा रोगांवरील उपचारांमध्ये जणू काही एक क्रांतीच घडून आली. कधी बरे न होणारे, चिवट आणि विद्रूप करणारे त्वचेचे आजार आटोक्यात येऊ लागले. यामुळे या औषधांचा प्रसार झाला. स्टेरॉइडच्या वापरामुळे त्वचेवरील काळे डाग नाहीसे होऊन त्वचा नितळ झाली. यामुळे स्टेरॉइडचा वापर केवळ औषध म्हणून न राहता एक सौंदर्यप्रसाधन म्हणून त्याकडे बघितलं जाऊ लागलं. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळणाऱ्या आणि अतिशय स्वस्त अशा या स्टेरॉइड क्रीम्सचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर डॉक्टरी सल्ल्याशिवाय अशा क्रीम्सच्या खरेदी-विक्रीला आळा घालण्याच्या सरकारच्या निर्णयानं हा दुरूपयोग टळू शकेल.स्टेरॉइडची दुधारी तलवारस्टेरॉइड हे नैसर्गिक हार्मोन (संप्रेरक) आहे. आपल्या शरीरात ते योग्य प्रमाणात बनत असतं. स्टेरॉइड हार्मोन माणसाच्या जगण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती ही दुधारी तलवार आहे. योग्य प्रमाणातील ही शक्ती रोगांपासून बचाव करते; पण याचा अतिरेक झाल्यास नवीन आजार उद्भवू शकतात. त्वचेचे बरेचसे आजार या प्रकारात मोडतात. अशावेळेस योग्य प्रमाणात वापरलेली स्टेरॉइड क्रीम्स या रोगप्रतिकार शक्तीला आटोक्यात ठेवून आजार बरे करतात. त्यामुळे स्टेरॉइड क्रीम्सना सुरीची उपमा देता येईल. गुंडाच्या हातातील चाकू एखाद्याचा प्राण घेऊ शकतो तर सर्जनच्या हातातील सुरी एखाद्याचा प्राण वाचवू शकते. डॉक्टरी सल्ल्यानुसार वापरलेली स्टेरॉइडची क्रीम उपयोगाची ठरतात, तर आपल्या मनानं वापरलेली ही क्रीम्स अतिशय नुकसान करतात.अॅडिक्शनचे घातक परिणामस्टेरॉइड क्रीमच्या अतिवापरामुळे त्वचा पातळ होते. पातळ झाल्यामुळे त्वचेच्या आतील रक्तवाहिन्या स्पष्ट दिसायला लागतात. त्यामुळे त्वचा लालसर गोरी दिसू लागते. तात्पुरता असणारा हा परिणाम नियमित वापरामुळे रंग उजळ झाल्याचा एक भास निर्माण करतो.क्रीमचा वापर थांबवल्यास त्वचेचा रंग पूर्ववत होतो. म्हणून या क्र ीमच्या वापराचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत व्यसनच जडतं. याला स्टेरॉइड अॅडिक्शन असं म्हणतात. ही पातळ झालेली त्वचा इतर काही गंभीर समस्या निर्माण करू शकते. या क्रीम्समुळे त्वचेवर अतिरिक्त केस आणि मुरूम, पुरूळदेखील येऊ शकतात.त्वचेवर होणाºया दुष्परिणामाव्यतिरिक्त शरीरात या क्रीम्समुळे अॅण्टी फंगल रेसिस्टन्स निर्माण होतो. कारण कुठल्याही काळ्या डागावर डॉक्टरी सल्ल्याशिवाय, स्वत:च्या मनानं ही क्रीम्स लावली जातात. त्यामुळे त्वचेवरील त्या भागातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते. नायटा-गजकर्णसारखे साध्या सरळ सोप्या औषधांनी बरे होणारे आजार यामुळे किचकट बनतात.आजार बरा होण्यासाठी जास्त वेळ लागतो. हे सगळं पाहता डॉक्टरी सल्ल्याशिवाय स्टेरॉइड क्रीम्सवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्हच आहे. कोणी स्टेरॉइड क्रीमचा गैरवापर करताना आढळल्यास त्याचं प्रबोधन करणं गरजेचं आहे.फक्त गोºया रंगाला भुलून जाऊन आंतरिक सौंदर्याकडे दुर्लक्ष करू नका.ब्लॅक इज ब्यूटिफूल या अमेरिकेतील चळवळीला आपणही हातभार लावूया आणि सुंदर दिसण्यासाठी स्टेरॉइड क्रीम्सचा वापर त्वरित थांबवू या !
(लेखिका ख्यातनाम त्वचारोग तज्ज्ञ आहेत.ketkiygogate@gmail.com)