प्रत्येक नवव्या पुरुषाचा हृदयविकारामुळे मृत्यू?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2016 2:15 PM
प्रत्येक नऊ पुरुषांपैकी एकाचा अचानक आलेल्या हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका असतो.
एका नव्या संशोधनानुसार प्रत्येक नऊ पुरुषांपैकी एक आणि प्रत्येक तीस महिलांमध्ये एका महिलेचा अचानक आलेल्या हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका असतो.दरवर्षी हजारो लोकांचा अशा प्रकारे अचानक आलेल्या हार्टअॅटॅकमुळे मृत्यू होतो. विशेष म्हणजे ज्या लोकांमध्ये हृदयविकाराची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत त्यांनादेखील हा धोका लागू पडतो. नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील डोनल्ड ल्यॉईड-जोन्स यांनी सांगितले की, अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणार्या मृतांचा अभ्यास करणे फार अवघड आहे. कारण अशा बहुतांश रुग्णांमध्ये त्यापूर्वी कधीच हृदयाच्या समस्या आढळलेल्या नसतात आणि अचानक मृत्यू झाल्यामुळे त्यासमयी त्यांचे वैद्यकीय प्रमाणांनुसार निरीक्षण करणेदेखील शक्य होत नाही.ल्याईड-जोन्स यांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, अचानक हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता पुरुषांमध्ये महिलांपेक्षा जास्त असते. वयाच्या ४५ वर्ष वय असलेल्या सर्वपुरुषांमध्ये १०.९ टक्के तर महिलांमध्ये २.८ टक्के शक्यता असते. ज्या लोकांमध्ये दोनपेक्षा जास्त हृदयविकारासंबंधी लक्षणे असतात त्यांच्यामध्ये तर हा धोका १२ टक्के (आठ पुरुषांमध्ये एक) एवढा असतो.प्रस्तुत संशोधनात २८ ते ६२ वयोगटातील ५२०० स्त्री-पुरुषांचा अभ्यास करण्यात आला होता. ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल पातळी, धुम्रपान आणि मधुमेह या रिस्कफॅक्टर्सवर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले होते. यांपैकी ३७५ जणांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.