मुलांचे कौशल्य विकसित करताना...!!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2016 2:29 PM
मुलांवर वरचढ न होता, त्यांच्यातील सुप्तगुणांची वाढ म्हणजेच कौशल्यांचा विकास होण्याच्या दिशेने मदत करणे, हे पालकांचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे
रवींद्र मोरे मुलांवर वरचढ न होता, त्यांच्यातील सुप्तगुणांची वाढ म्हणजेच कौशल्यांचा विकास होण्याच्या दिशेने मदत करणे, हे पालकांचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. मुलांच्या गुणांची आपण प्रभावीपणे कशी वाढ करु शकतो यासाठी प्रत्येक पालकांनी काय काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत आज ‘सीएनएक्स’च्या माध्यमातून आपण नेमके हेच जाणून घेऊया... लहान मुले जसे मोठे होतात तसे त्यांच्यातील सुप्तगुणांचीदेखील सोबतच वाढ होत असते. मात्र त्या सुप्तगुणांना योग्य वेळी चालना मिळाली नाही तर ते सुप्तगुण लुप्त होतात आणि त्याचाच परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. आणि आयुष्यात असामान्य कामे करायला प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी योग्य वेळी त्या गुणांचे संवर्धन होणे तेवढेच गरजेचे आहे, जेवढे की त्यांची शारीरिक वाढ होणे. आणि याच सुप्तगूणांचा म्हणजे कौशल्यांचा विकास करणे हे पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. मात्र त्या सुप्तगुणांचा विकास करणे हे पालकत्त्वासाठी एक प्रकारचे आवाहनदेखील आहे. आपला मुलगा सर्वगुण संपन्न असावा, असे कुणाला वाटणार नाही. दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे. आणि या स्पर्धेची जाणिव आता सर्वच पालकांना सतावू लागली आहे. मात्र धकाकीच्या जीवनात आपल्या पाल्यास घडविण्यासाठी पालकवर्गाकडे आवश्यक तेवढा वेळ नाही. मग त्यासाठी पालकवर्ग आपल्या पाल्यास घडविण्यासाठी बाहेरचे पर्याय शोधतात आणि अवाढव्य खर्चही करतात. मात्र एवढा खर्च करुनही आणि एवढी मेहनत घेऊनही आपला पाल्य घडेलच याची शाश्वती नसते. मात्र तज्ज्ञांच्या मते काही साध्यासोप्या गोष्टी जर पालकांनी केल्या तर आपल्या पाल्यातील कौशल्यांचा विकास होऊन तो परिपूर्ण बनू शकतो. मुलांच्या विश्वात सहभागी व्हाआपले मुले जर अभ्यासात रमले असतील तर त्यांचे निरिक्षण करा. शैक्षणिक कौशल्यांमध्ये त्याची प्रगती चांगली असेल, तर त्यांचे कौतुक करा. त्यातील आपला अनुभव त्यांच्याशी शेअर करा. आणि विशेष म्हणजे हे सर्व जाणून घेताना त्यांचेही भावविश्व आहे, हे विसरु नका आणि त्यांच्या विश्वात रममाण व्हा. श्रमाचे महत्त्व पटवा लहानपणापासून आपल्या मुलांवर श्रम संस्काराची जोपासणा करा. श्रमाने आपल्यातील गुणांचे सोने होते, हे त्यांना शिकवा. श्रमाने आपली बौद्धिक आणि शारीरिक वृद्धी होत असते. आणि या वृद्धीचा आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात सिंहाचा वाटा असतो. घडलेल्या व्यक्तिमत्त्वातून भविष्यातील आव्हानांना आपण सहज पेलू शकतो. वेळेचा सदुपयोगआयुष्यातील एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही, म्हणून मुलांना सुरुवातीपासूनच वेळेचा सदुपयोग करायला शिकवा. तसेच त्यांना फावल्या वेळेत प्रोडक्टिव्ह व्हायला शिकवा. त्याच्यातील गुणांना चालना देणाºया चांगल्या शिक्षकांकडे पाठवा. तसेच त्यांच्या कौशल्यांकडे चांगल्या प्रकारे लक्ष देणाऱ्या शाळेत त्याचे अॅडमिशन करा. वेगवेगळ्या स्पर्धा पाहायला तसेच स्पर्धेत सहभाग घ्यायला त्याला प्रोत्साहन द्या. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी किती कष्ट करायची गरज आहे, याची कल्पना त्याला येईल.प्रेरणा / प्रोत्साहन द्यामुलांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्याबाबत त्यांना प्रेरणा देऊन त्यातील त्यांची प्रेरणेची पातळी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी जमवू द्या. त्यासाठी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील पुस्तके, नियतकालिके, व्हिडिओ आदी खरेदी करु शकता. मुलांना पुरेसा स्पेस, मोकळीकता द्यामुले जराही मोकळे दिसले तर पालक लगेच अभ्यास कर... हे कर... ते कर...म्हणजे कशात तरी गुंतवूण ठेवतात. मात्र यामुळे त्यांच्यातील कौशल्य लुप्त होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. मुलांचा सर्वांगिण विकासासाठी त्यांना सतत एकाच गोष्टींचा भडिमार करु नका. मुलाला त्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी पुरेशी मोकळीक द्या. मुलाला त्याचे काम करण्यासाठी प्रायव्हसी मिळावी यासाठी तुमच्या घरातील एखादी जागा त्याच्यासाठी तयार करा.