सगळीकडे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवसांत सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. तसेच बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचाही आधार घेतला जातो. पण या दिवसांत घराची साफसफाई, फराळाची तयारी यामध्ये स्वतःसाठी वेळ काढणं फार अवघड असतं. अशातच लाइफस्टाइल एक्सपर्ट दीपशिखा देशमुख यांनी आपल्याला काही उपाय सांगितले आहेत. जाणून घेऊया सविस्तर...
आपण अनेकदा सुंदर दिसण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या वस्तूंचा आधार घेतो. पण त्यामध्ये अनेक केमिकल्सचा वापर करण्यात आलेला असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकवेळी बाजारातील उत्पादनांचा आधार घ्यावा असं नाही, तर तुम्ही आपल्या स्वयंपाक घरात आढळून येणाऱ्या गोष्टींचाही आधार घेऊ शकता. जाणून घेऊया काही खास घरगुती उपाय...
चेहरा उजळवण्यासाठी...
- एका बिट पाण्यात उकडून ते कुस्करून घ्या. - कुस्करलेल्या बिटामध्ये एक चमचा दूध आणि अर्धा चमचा चंदनाची पावडर एकत्र करा. - मिश्रण व्यवस्थित एकजीव करून चेहऱ्याला लावा. - सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.
तसेच नैसर्गिक आद्रता आणि कोलोजन वाढविण्यासाठी कोरफडीचा रस किंवा जेल दररोज चेहऱ्यावर लावणं फायदेशीर ठरतं.
डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यासाठी...
- ताज्या गाजराचा रस डोळ्यांभोवती लावा, किमान 20 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर धुवून टाका. - काकडी आणि मध एकत्र करून डोळ्यांभोवती लावा.
पुरळ येत असतील तर...
- पुदिन्याची काही पानं बारिक वाटून घ्या. - एक चमचा पाणी तसेच अर्धा चमचा हळद त्यामध्ये एकत्र करा. - मिश्रण व्यवस्थित करून पुरळ येत असलेल्या ठिकाणी लावा. 15 ते 20 मिनिटं तसचं ठेवा.- कोमट पाण्याने धुवून टाका. - पुदिन्यातील अॅन्टीऑक्सिडंट्स पुरळ कमी करतात. उत्तम परिणामांसाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा हा फेसपॅख वापरा.
केसांच्या सौंदर्यासाठी...
- दोन चमचे आवळ्याची पावडर, एक चमचा कॉफी आणि थोडा कांद्याचा रस एकत्र करून घ्या. - तयार मिश्रण केसांना लावा. केस चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होते.
(टिप : वरील सर्व उपाय केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)