चांगल्या मानसिक आरोग्यसाठी हवी डोक्याला खुराक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2016 2:49 PM
उतार वयात डोक्याला शक्य तितके व्यस्त ठेवावे. कारण डोक्याला खुराक असेल तर मानसिक आरोग्य चांगले राहते.
असे म्हणतात की, उतार वयात देव-धर्म करावे आणि शांत बसून जीवनाचा आनंद घ्यावा. परंतु नवे संशोधन असे सांगते की, उतार वयात मेंदूला शक्य तितके व्यस्त ठेवावे. कारण डोक्याला खुराक असेल तर मानसिक आरोग्य चांगले राहते.संशोधनाच्या निष्कर्षांनुसार वय आणि शिक्षण कितीही असू द्या, व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्या मेंदूची कार्यप्रणाली अधिक वेगवान होते, स्मरणशक्ती व आकलन क्षमता वाढते.टेक्सास विद्यापीठातील संशोधिका सेरा फेस्टिनी यांनी माहिती दिली की, अधिक प्रमाणा व्यस्त असेलेल्या लोकांची आकलन क्षमता इतर लोकांपेक्षा जास्त असते. विशेषकरून नवीन शिकलेल्या माहितीबाबत त्यांची स्मरणशक्ती फार सक्षम असते.या व्यतिरिक्त जे लोक दिवसभर कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेले असतात, त्यांची एपिसोडिक मेमरीदेखील चांगली असते. भूतकाळातील गोष्टी त्यांना अधिक चांगल्याप्रकारे लक्षात राहतात.तसेच व्यस्त लोकांचा दैनंदिन जीवनात विविध गोष्टींशी संबंध येत असल्यामुळे त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची अधिक संधी असते. ‘फ्रं टियर्स इन एजिंग न्युरोसायन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित या संशोधनात 50 ते 89 वर्षे वयोगटातील 330 स्वस्थ व निरोगी स्त्री-पुरुषांचा अभ्यास करण्यात आला. विविध न्युरोसायकोलॉजिकल चाचण्यांद्वारे त्यांची बौद्धिक क्षमता तपासण्यात आली.यातून असे दिसून आले की, व्यस्त जीवनशैलीमुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते व टिकून राहते. तरीदेखील यासंदर्भात आणखी संशोधन करण्याची गरज असल्याचे मत सेरा फेस्टिनी यांनी व्यक्त केले.