अलिकडे आपल्या सौंदर्यात भार घालण्यासाठी अनेक महिला कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. अशावेळी मेकअप करताना डोळ्यांचं मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सुंदर डोळ्यांनी तुमचं व्यक्तिमत्व आणखी सुंदर होतं. अनेकदा डोळ्यांचं मेकअप करताना केल्या जाणाऱ्या चुकांमुळे डोळ्यांमध्ये इन्फेक्शन आणि इतरही काही समस्या होण्याचा धोका असतो. त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करणाऱ्या महिलांनी डोळ्यांचं मेकअप करताना खालील गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
स्वच्छतेची घ्या काळजी
कॉन्टॅक्ट लेन्स लावताना हात चांगल्याप्रकारे स्वच्छ करुन स्वच्छ कापडाने पुसा. कॉन्टॅक्ट लेन्सला हात लावताना हात स्वच्छ आणि कोरडे असले पाहिजे. त्यानंतर डोळ्यांवर लेन्स लावण्यापूर्वी लेन्स सोल्यूशनने नक्की स्वच्छ करा. याचप्रकारे लेन्स काढल्यावरही स्वच्छ करुन बॉक्समध्ये ठेवा. याने तुमच्या डोळ्यांना इन्फेक्शन होणार नाही.
योग्य मेकअप उत्पादनांचा वापर
बाजारात मिळणारे जास्तीत जास्त मेकअप उत्पादने सामान्य डोळ्यांसाठी तयार केलेले असतात. जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स लावत असाल तर तुमचे डोळे अधिक संवेदनशील होतात. त्यामुळे तुम्हाला डोळ्यांच्या मेकअपसाठी उत्पादनांची निवड करताना काळजी घ्यावी लागेल. तुमच्यासाठी हायपोएलर्जेनिक मेकअप उत्पादनांचा वापर करणे अधिक चांगले ठरेल. कारण या उत्पादनांमुळे अॅल्रजी होण्याची शक्यता कमी असते.
लेन्स लावल्यावर करा मेकअप
डोळ्यांचं मेकअप करण्यापूर्वी तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट लेन्स काळजीपूर्वक आणि स्वच्छतेने लावा. त्यानंतर प्रायमर लावा, कारण याने शॅ़डोज आणि लायनर ठिक राहतात. काळजी घ्या की, तुम्ही पावडरऐवजी क्रिम शॅडोजचा वापर करा. जेणेकरुन ते तुमच्या डोळ्यात येणार नाही. क्रीम शॅडोज डोळ्यांमध्ये जास्त जळजळ निर्माण करतात त्यामुळे काळजी घ्यावी. वॉटर बेस्ड क्रीम शॅडोजचा वापर करा.
आयलायनर
कॉन्टॅक्ट लेन्स लावणाऱ्यांनी जेल किंवा क्रीम लायनर्सऐवजी पेन्सिल लायनर्सचा वापर करावा. यासाठी लेड असलेल्या पेन्सिलचा वापर करु नका कारण लेडचे कण डोळ्यांसाठी नुकसानकारक होऊ शकतात.
मस्कारा
फायबर मस्कारा किंवा लॅश एक्सटेंडिंग मस्काराचा प्रयोग टाळावा. तसेच कॉन्टॅक्ट लेन्स लावणाऱ्यांनी वॉटर प्रऊफ मस्कारा लावणेही टाळले पाहिजे. आयलॅश डायचा वापर करताना काळजी घ्यावी कारण याने डोळ्यांना इन्फेक्शन किंवा इतरही काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
हेही ठेवा लक्षात
जर कोणत्याही मेकअप उत्पादनांमुळे तुमच्या डोळ्यात जळजळ किंवा त्रास होत असेल तर लगेच डोळे पाण्याचे धुवून घ्या किंवा त्रास अधिक असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अलिकडे बाजारात अशी अनेक उत्पादने आली आहेत जी केवळ कॉन्टॅक्ट लेन्स लावणाऱ्यांसाठीच तयार करण्यात आले आहेत.