काळे लांब केस महिलांच्या सौंदर्यात भर घालतात हे काही वेगळं सांगायला नको. पण केमिकल युक्त हेअर प्रॉडक्ट वापरल्याने केस आणखी ड्राय आणि निर्जीव होतात. अशात होममेड हेअर मास्क तुमच्या केसांच्या गरजा पूर्ण करण्यासोबत तुमची लांब आणि मुलायम केसांची इच्छाही पूर्ण करतात. ज्याप्रकारे तुम्ही तुमच्या चेहऱ्याची त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी फेस पॅकचा वापर करता त्याचप्रमाणे केसांची सुंदरता वाढण्यासाठी हेअर मास्कचा वापर केला जाऊ शकतो.
शीया बटर मास्क
केसांना माइल्ड शॅम्पूने धुतल्यावर आणि केस कोरडे झाल्यावर त्यांना शीया बटर लावा. हे मास्क केसांच्या मुळापर्यंत लावा. त्यानंतर टॉवेल गरम पाण्यात भिजवून चांगल्याप्रकारे पिळून डोकं अर्ध्या तासांपर्यंत झाकून ठेवा आणि त्यानंतर केस पुन्हा धुवा. जर तुमचे केस जास्त ड्राय असतील तर आठवड्यातून दोनदा याचा वापर करा.
बीअर मास्क
बीअर केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी वापरली जाऊ शकते. बीअर केसांसाठी चांगल्या शॅम्पू आणि कंडिशनरचं काम करु शकते. यात फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि मालटोस असतं जे केसांसाठी फार फायदेशीर असतं. मास्क तयार करण्यासाठी २ चमचे बीअरमध्ये एक चमचा कॅस्टर ऑइल, एक चमचा एग योक आणि थोडं मध मिश्रित करा. हे मास्क केसांना १० मिनिटे लावून ठेवल्यावर हलक्या हाताने मसाज करा. याने केस मुलायम आणि चमकदार होतील.
बनाना अॅन्ड हनी मास्क
केळी केसांच्या मुळांना मजबूत करण्याचं काम तर करतंच सोबतच यातील आयर्न आणि व्हिटॅमिनने केसांना अधिक प्रमाणात पोषण मिळतं. बनाना मास्कने तुटलेल्या केसांमध्ये नव्याने जीव येतो. हे मास्क तयार करण्यासाठी एक केळी चांगल्याप्रकारे ब्लेंड करुन त्यात एक चमचा मध मिश्रित करा. आता हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर आणि केसांना लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी केस चांगले धुवा.
एवोकॅडो मास्क
एवोकॅडोमध्ये असलेलं नेसर्गिक तेल निर्जीव केसांसाठी कंडिशनिंगचं काम करतं. हे मास्क तयार करण्यासाठी एक एवोकॅडो सोलून बारीक करा. यात दोन चमचे ऑलिव ऑइल मिश्रित करा. हे मिश्रण साधारण ३० मिनिटांसाठी केसांना लावा. त्यानंतर केसांची मसाज करत केस धुवा.
ओटमील मास्क
जर तुमच्या डोक्याची त्वचा अधिक ऑयली असेल तर ओटमील मास्क तुमच्यासाठी चांगलं ठरेल. हे केसांमधील एक्स्ट्रा ऑइल काढून त्यांना पोषण देतं. हे मास्क तयार करण्यासाठी एक चमचा ओटमीलमध्ये एक चमचा दूध आणि एक चमचा आलमंड ऑइल मिश्रित करा. ही पेस्च डोक्याच्या त्वचेसोबत केसांवर लावा. १५ ते २० मिनिटांनी केस धुवा.