फार पूर्वीपासूनचं त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी हळदीचा वापर करण्यात येतो. हळदीमधील पोषक तत्व आणि अॅन्टीऑक्सिडंट त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. हळद फक्त त्वचेचं सौंदर्यच वाढवत नाही तर चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठीही मदत करते. सध्या बाजारामध्ये अनेक ब्युटी प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. यांपैकी अनेक उत्पादनांमध्ये हळदीचा वापर करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. पण बाजारातील उत्पादनांऐवजी घरीच हळदीचा वापर करून फेसपॅक तयार केले तर ते त्वचेसाठी आणखी फायदेशीर ठरतात.
पिंपल्ससाठी हळदीचा फेसपॅक
तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्समुळे हैराण असाल तर, हळदीमध्ये दोन चमचे चंदनाची पावडर, एक चमचा बेसन आणि एक लिंबाचा रस एकत्र करा. त्यामध्ये 2 चमचे कच्चं दूधही एकत्र करा. आता हे सर्व एकत्र करून घ्या आणि चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. डोळ्यांना लागणार नाही याची काळजी घ्या. अर्धा तास असंच ठेवा आणि त्यानंतर हातांनी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा आणि मॉयश्चरायझर लावा.
चेहऱ्यावर जर डाग असतील तर 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर हळदीचा लेप लावल्याने ते कमी होतात. त्यासाठी 2 चमचे बेसन पिठामध्ये अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे ताजं दही एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
पिंपल्स दूर करण्यासाठी हळद आणि ओट्सचा फेसपॅकही अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यासाठी 2 चमचे ओट्स घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा दही, एक चमचा मध आणि एक लिंबू एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून अर्धा तासासाठी तसचं ठेवा आणि थंड पाण्याने धुवून टाका.
हळदीचे त्वचेला होणारे फायदे :
1. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये अॅन्टीसेप्टिक आणि अॅन्टी-इनफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. जे त्वचेवरील प्रदूषण आणि घाण दूर करून त्वचेचं रक्षण करतात. 2. हळद फक्त गोरा रंगच देत नाही तर वाढत्या वयाची लक्षणं रोखण्याचंही काम करते.
3. डार्क सर्कल्स दूर करण्यासाठीही हळद फायदेशीर ठरते. त्यासाठी हळदीमध्ये थोडासा ऊसाचा रस आणि दही एकत्र करून लावा. काही दिवसांमध्येच डार्क सर्कल्स दूर होतील.
4. हळदीचा वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. त्यासाठी हळद, तांदळाचं पीठ, कच्चं दूध आणि टॉमेटोचा रस एकत्र करून 30 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.
5. त्वचा टॅन झाली असेल तर त्यावर उपाय म्हणूनही हळदीचा वापर करण्यात येतो. त्यासाठी लिंबाचा रस एकत्र करून टॅनिंग झालेल्या त्वचेवर लावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.