आॅफिसमधील ‘केक कल्चर’ आरोग्यास घातक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2016 7:46 AM
‘केक कल्चर’ आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकते, असे प्रा. नायजेल हंट सांगतात.
आॅफिसमध्ये सहकर्मचार्याचा वाढदिवस असेल तर सहाजिकच सर्वजण मिळून तो साजरा करतात. अनेक कंपन्यांमध्ये तर कर्मचाऱ्यांचे वाढदिवस, वेडिंग अॅनिव्हर्सरी केक कापून साजरी करण्याची प्रथाच असते.परंतु हे ‘केक कल्चर’ आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकते, असे प्रा. नायजेल हंट सांगतात.‘रॉयल कॉलेज आॅफ सर्जन्स’च्या दंतचिकित्सा विभागाचे सदस्य असणारे प्रा. हंट दंतवैद्यांसाठी आयोजित वार्षिक स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात बोलत होते.‘केक कल्चर’मुळे लठ्ठपणा आणि दातांचे अनेक आजार होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. त्यामुळे केकऐवजी फळे, नट्स किंवा चीज खाण्याचा सल्ला ते देतात.आपल्या भाषणात ते म्हणाले, वजन कमी करण्याच्या इच्छेला केक कल्चरमुळे अडसर निर्माण होतो. जे लोक अगदी मनापासून वजन कमी करण्यसाठी प्रयत्नशील असतात त्यांच्यासमोर जर आॅफिसमध्ये केक आला तर त्यांच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फेरले जाते. कित्येक लोक गोड पदार्थांचे सेवन प्रामुख्याने आॅफिसातच करतात.आता याचा अर्थ असा नाही की, प्रा. हंट केकच्या एकदम विरोधात आहेत. केक आणावा पण तो कमी प्रमाणात असावा आणि तो केवळ लंचसोबत खाण्यात यावा.साखर आणि स्टार्च असणारे अन्नपदार्थ शक्यतो टाळण्याचा डेन्टिस्ट सल्ला देतात. अशा पदार्थामुळे बॅक्टेरिआ वाढून दातांना कीड लागण्यास कारणीभूत आम्ल तयार होते. म्हणून आरोग्याविषयी जागरूक होऊन कंपन्यांनी केक कल्चरला आळा घालण्याचा प्रयत्न करावा.