(Image Credit : www.beingrepublic.com)
होळीला अनेकच रंग खेळण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. पण नैसर्गिक रंगांचा वापर केला तर रंगांत रंगण्याचा तुम्ही वेगळाच आनंद घेऊ शकता. पण बाजारात अनेक केमिकल्सयुक्त रंगांचा भरना झाला आहे. होळीला सर्वच प्रकारचे चांगले-वाईट रंग आपल्या संपर्कात येतात. याने आपल्या त्वचेचं-शरीराचं नुकसान होतं. रंग खेळताना किंवा खेळून झाल्यावर याकडे आपण फार गांभीर्याने बघत नाही. पण पुढे जाऊन हे फार गंभीर ठरू शकतं. कारण केमिकलयुक्त रंगाने शरीराला अनेक नुकसान होतात.
काय काय होतात नुकसान?
1) रंग खेळताना रंग डोळ्यात जाण्याचा सर्वात जास्त धोका असतो. डोळ्यात रंग गेल्यावर जळजळ होणे आणि डोळे लाल होणे ही सामान्य बाब आहे. त्यासोबतच केमिकलयुक्त रंग डोळ्यात गेल्याने डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.
२) केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचेचं फार जास्त नुकसान होतं. रंग लावल्यावर खाज येणे, डाग पडणे आणि सूज येणे अशा समस्या होतात. तसेच स्कीन कॅन्सर होण्याचा धोकाही असतोच.
३) लोकांचं असं मत असतं की, कोरड्या रंगांनी रंग खेळणे अधिक सुरक्षित असतं. पण असं होत नसतं. कोरडा रंग हवेतून आपल्या नाकात आणि तोंडाच्या माध्यमातून शरीरात जातो. यामुळे दमा किंवा श्वासासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते.
४) बाजारात मिळणारे केमिकलयुक्त रंग केसांनाही प्रभावित करतात. केसांना रंग लावल्यानंतर केसगळती, डॅंड्रफसारखी समस्या होते.
कसा कराल बचाव?
1) होळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही रंगांमध्ये मेटल ऑक्साइड मिश्रित केलेलं असतं. ज्यामुळे केसांचं फार जास्त नुकसान होतं. त्यामुळे रंग खेळण्याआधी खोबऱ्याचं किंवा मोहरीचं तेल केसांना लावा.
२) रंग खेळायला जाण्याआधी शरीरावर तेल लावा. याने रंग शरीरावर जास्त वेळ टिकणार नाही. त्यासोबतच कान, नाक, डोळ्यांच्या आजूबाजूला व्हॅसलीन लावा. असे केल्याने हानिकारक रंग त्वचेच्या आत जाणार नाहीत.
३) रंग काढण्यासाठी अनेकदा लोक गरम पाण्याचा वापर करतात, पण असे केल्याने रंग आणखी घट्ट शरीरावर बसतो. त्यासोबतच त्वचाही कोरडी पडते. त्यामुळे रंग काढण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा.
४) अनेकदा लोक रंग काढण्यासाठी केरोसीन ऑइल, पेट्रोल याचाही वापर करतात. असे केल्याने शरीरावर पुरळ येण्याची शक्यता असते. रंग काढण्यासाठी घरी तयार केलेल्या बेसनाची पेस्ट शरीरावर लावा.