बदलणाऱ्या वातावरणाचा आरोग्यासोबतच त्वचेवरही परिणाम होतो. अशातच हाता-पायांच्या आणि चेहऱ्याच्या त्वचेसोबतच ओठांची त्वचाही कोरडी होते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यासोबतच ओठांच्या त्वचेची काळजी घेणं फायदेशीर ठरतं. अन्यथा ओठांची त्वचा कोरडी होते किंवा काळी पडते. ओठांना स्क्रब करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे स्क्रब उपलब्ध आहेत. परंतु, तुम्ही घरीच लिप स्क्रब तयार करू शकता. त्यामुळे तुमचे ओठ मुलायम आणि सुंदर होण्यास मदत होते.
खोबऱ्याचं तेल आणि मध
एक चमचा खोबऱ्याच्या तेलात मध, 2 चमचे साखर, अर्धा चमचा कोमट पाणी एकत्र करून स्क्रब तयार करा. हे 2 ते 3 मिनिटांसाठी सर्क्युलर मोशनमध्ये ओठांवर लावून कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. खोबऱ्याच्या तेलामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट, फॅटी अॅसिड आढळून येतं. जे त्वचेला पोषण देतं. साखर नैसर्गिक एक्सफोलिएटर काम करते. ज्यामुळे त्वचेच्या मृत पेशी आणि कोरडी त्वचा पूर्णपणे निघून जाते. मधामुळे ओठ मुलायम होण्यास मदत होते.
मिंट स्क्रब
2 चमचे ऑलिव्ह ऑइल किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये 2 चमचे साखर, 8 ते 10 थेंब पुदिन्याचं तेल, अर्धा चमचा द्राक्षांच्या बियांचं तेल एकत्र करून स्क्रब तयार करा. पुदिन्याचं तेल ओठांमधील रक्तप्रवाह वाढवतं, त्यामुळे ओठ आकर्षक दिसतात. तसेच द्राक्षांच्या तेलात अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ओठ मुलायम होण्यास मदत होते.
ब्राउन शुगर आणि मध
एक चमचा मधामध्ये एक चमचा ब्राउन शुगर एकत्र करा. त्यामध्ये 5 ते 6 थेंब लव्हेंडर ऑिल मिक्स करा. तयार मिश्रणाने स्क्रब करा. यामुळे ओठांचा रंग उजळवण्यासाठी मदत होते. तसेच ओठांची काळवंडलेली त्वचाही दूर होते.
चॉकलेट स्क्रब
एक चमचा कोको पावडर, व्हेनिला एक्स्ट्रॅक्ट, 2 चमचे ब्राउन शुगर, ऑलिव्ह ऑइल आणि मध एकत्र करा. तयार पेस्टने ओठांवर स्क्रब करा. यामुळे ओठ मुलायम होण्यासोबतच टॅन फ्रीदेखील होतात.
दालचिनी
अर्धा चमचा दालचिनी पावडर, मध, ऑलिव्ह ऑइल एकत्र करून ओठांवर स्क्रब करा. यामुळे ओठांवरील डेड स्किन दूर होण्यास मदत होते.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)