Dry Skin In Winter : हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा रखरखीत, कोरडी होते आणि त्वचेवर खाजही येते. त्वचा उलण्याची समस्याही या दिवसात खूप होते. अनेक उपाय करूनही त्वचेवरील खाज काही दूर होत नाही. डोक्यासोबतच हिवाळ्यात हात, पाय, मान किंवा शरीरावर खाज येते. त्वचेवर सतत खाज येत असेल तर इन्फेक्शन किंवा जखम होण्याचा धोकाही असतो. अशात ही समस्या दूर करण्यासाठी लगेच काही घरगुती उपाय केले पाहिजे.
मोहरीचं तेल
मोहरी किंवा राईचं तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. हे तेल त्वचेवर लावल्यास त्वचेचा कोरडेपणा जाऊन मुलायम होते. कोरडी त्वचा मुलायम झाली की, खाज येण्याची समस्याही दूर होतते. कारण कोरडी त्वचा खाजेचं एक कारण आहे. पूर्वीपासून लोक आंघोळ करण्याआधी शरीराला मोहरीचं तेल लावतात. याने त्वचा मुलायम होते. तसेच या तेलाने त्वचेला पोषण मिळतं. त्वचेवरील खाज दूर करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
कडूलिंब
कडूलिंब हा त्वचेसाठी फार फायदेशीर असतो. कारण या झाडाच्या पानांमध्ये अॅंटीसेप्टिक आणि अॅंटी बायोटिक गुण असतात. जे खाज दूर करण्यासाठी फायदेशीर असतात. यासाठी कडूलिंबाची पाने पाण्यात उकडा घ्या आणि हे पाणी कोमट झाल्यावर आंघोळ करा किंवा ही पाने बारीक करुन दह्यासोबत खाज येणाऱ्या जागेवर लावून ठेवा. यानेही खाज दूर होते.
लिंबाचा रस
खाज दूर कऱण्यासाठी सर्वाच चांगला घरगुती उपाय म्हणजे लिंबू. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लिंबू घरात सहज मिळतं. लिंबामध्ये अॅसिडिक आणि सिट्रिक अॅसिड असतं. याने खाजेची समस्या दूर करण्यास मदत मिळते. हा उपाय करण्यासाठी लिंबाचा रस पाण्यात टाका आणि खाज येणाऱ्या जागेवर लावा. याने थोडं जळजळ होईल, पण नंतर आराम मिळेल. तसेच दोन चमचे तुळशीच्या पानांचा रस आणि दोन चमचे लिंबाचा रस मिश्रित करुन खाज येत असलेल्या जागेवर लावा. याने खाज दूर होईल.
झेंडूची पाने
झेंडूच्या पानांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी वायरल आणि अॅंटी फंगल गुण असतात. याने तुमची खाजवण्याची समस्या दूर होते. यासाठी तुम्हाला झेंडूच्या झाडाची काही पाने पाण्यात टाकून उकळून घ्या. नंतर हे पाणी खाज येत असलेल्या जागेवर लावा. जर हा उपाय ७ दिवस केला गेला तर तुमची समस्या दूर होईल.