त्वचा गोरी असो किंवा सावळी अनेकदा हाताच्या कोपराची त्वचा काळवंडलेली दिसते. हे अस्वच्छतेमुळे होत नाही, तर या भागात मृत पेशी साठल्याने हा भाग शरीराच्या त्वचेपेक्षा काळवंडलेला आणि निस्तेज दिसतो. हाताचा कोपर साफ आणि सुंदर असेल तर तुमचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे कोपराकडेही लक्ष देण गरजेचं असतं. तुम्ही सोप्या उपायांनी देखील कोपरांचा काळपटपणा नाहीसा करू शकता. जाणून घेऊयात हाताच्या कोपराची काळवंडलेली त्वचा उजळवण्यासाठी काही घरगूती उपाय...
- कोपराची काळवंडलेली त्वचा उजळवण्यासाठी एक लिंबाचा तुकडा घ्या. त्यावर चिमूटभर तूरटीची बारिक पूड टाका आणि कोपरावर 2 - 3 मिनिटांपर्यंत मसाज करा. कोपरावर साठलेल्या मृतपेशी साफ होण्यास मदत होईल.
- एक चमचा व्हिटॅमिन 'इ'च्या तेलामध्ये अर्धा चमचा साखर मिक्स करून याची पेस्ट तयार करा. या पेस्टने कोपरावर मसाज करा. कोपराचा काळेपणा दूर होण्यास मदत होईल.
- कोपराचा काळेपण दूर करण्यासाठी कोरफडीचा गर लावा आणि सुकल्यावर साध्या पाण्याने धुवून टाका. त्यानंतर एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये दूध मिक्स करून पेस्ट तयार करा. या पेस्टने हलक्या हाताने कोपरावर मसाज करा. त्यानंतर पाण्याने धुवून टाका.
- दह्याचा उपयोग करून देखील कोपराची काळवंडलेली त्वचा उजळवण्यास मदत होते. दह्यामध्ये थोडं व्हिनेगर मिक्स करून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट कोपरावर लावून ठेवा. सुकल्यानंतर धुवून टाका.
- कोपराची काळवंडलेली त्वचा उजळवण्यासाठी बेसन आणि दही मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट 15 मिनिटांपर्यंत लावून ठेवा. आठवडयातून 3 - 4 वेळा याचा उपयोग केल्यानं फायदा होईल.