भावंडामध्ये वाढतो ‘आॅटिझम’ धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2016 2:05 PM
मोठ्या भावंडापैकी जर कोणी आॅटिझमने ग्रस्त असेल तर लहान भावंडांना तो होण्याची शक्यता १४ पट अधिक असते.
आॅटिझम किंवा स्वमग्नता या आजाराबद्दल अजुनही मोठ्या प्रमाणात जनजागृती होताना दिसत नाही. एका नव्या संशोधनानुसार मोठ्या भावंडापैकी जर कोणी आॅटिझमने ग्रस्त असेल तर लहान भावंडांना तो होण्याची शक्यता १४ पट अधिक असते.आॅटिझम हा न्युरो-डेव्हेलोपमेंटल डिसआॅर्डर असून ही मुलं इतरांशी मिसळत नाहीत, ते आपल्याच विश्वात गुंग असतात. लोकांशी संवाद साधणे त्यांना अवघड जाते. अध्ययनातून असे दिसून आले की, मोठ्या भांवडाला आॅटिझमचा त्रास असेल तर लहान भावंडामध्ये तो आढळण्याचा दर ११.३ टक्के असतो आणि आॅटिझम नसणारे मोठे भावंड असेल हाच ०.९२ टक्के इतका कमी असतो.एवढेच नाही तर बाळाच्या जन्माच्या वेळी गर्भधारणेचे वय किती होते यावर देखील आॅटिझमचा धोका अवलंबून असतो. लहान भांवडमध्ये ज्यांचा जन्म २८ ते ३६ आठवड्यांच्या गर्भावस्थेनंतर झाला आणि त्यांचे मोठे भावंड आॅटिस्टिक असतील तर आॅटिझमचा धोका १० पटीने वाढतो.‘कैसर पर्मनेंटे’ या वैद्यकीय संशोधन संस्थेतील वैज्ञानिक डेरिअस गेटाहून यांनी माहिती दिली की, या संशोधनातून आॅटिझमचा भावंडावर कशाप्रकारे परिणाम होतो यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मोठ्या अपत्याला जर आॅटिझम असेल तर पालकांनी लहान अपत्याची चाचणी केलीच पाहिजे.