अनेकदा शरीरावरील नको असलेले केस तुमच्या सौंदर्याच्या आड येतात. खासकरून जर हे केस तुमच्या चेहऱ्यावर असतील तर त्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. अनेकदा बाजारामध्ये मिळणाऱ्या महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. एवढचं नव्हे तर पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंटही फॉलो करण्यात येतात. पण याऐवजी आपल्या घरातील स्वयंपाकघरातही असे काही पदार्थ उपलब्ध असतात, ज्यांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी नको असलेल्या केसांची समस्या दूर करू शकता. यामुळे तुम्हाला कोणतेही स्किन प्रॉब्लेम्स उद्भवणार नाहीत. घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साखरेच्या मदतीने शरीरावरील नको असलेले केस हटवता येतात. साखरेपासून घरच्या घरी वॅक्स तयार करून वॅक्सिंग करू शकता. या पद्धतीला शुगरिंग असं म्हणतात. ज्यामध्ये साखरेचा वापर करून वॅक्स तयार करण्यात येतं. जाणून घेऊया शुगरिंग नक्की आहे तरी काय? आणि याचा वापर नेमका करतात तरी कसा?
शुगरिंग म्हणजे काय?
शुगरिंगला शुगर वॅक्स असंही म्हणतात. शरीरावरील नको असलेले केस हटवण्यासाठी ही नैसर्गिक आणि अत्यंत सोपी पद्धत आहे. यामध्ये साखर, लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून वॅक्स तयार करण्यात येतं. जे त्वचेवरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
शुगर वॅक्स तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- 1 लिंबू
- अर्धा कप साखर
- अर्धा कप पाणी
कसं कराल शुगर वॅक्स :
शरीरावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी तुम्ही शुगर वॅक्स तयार करत असाल तर त्यासाठी साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून घ्या. आता यामध्ये पाणी एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. हे तोपर्यंत ब्लेंड करा जोपर्यंत याची एक स्टिकी पेस्ट तयार होत नाही. काही वेळासाठी ही पेस्ट तशीच ठेवा. आता एका स्पॅच्युलाच्या मदतीने तयार पेस्ट हातांवर लावा. त्यानंतर थोडीशी पेस्ट केसांच्या विरूद्ध दिशेला लावा. आता पेस्ट सुकू द्या. पेस्ट जास्त सुकू देऊ नका. जर पेस्ट जास्त सुकली तर कडक होते आणि हातावरून काढणं कठिण होऊन जातं. हातावर लावलेली पेस्ट थोडी सुकल्यानंतर केसांच्या विरूद्ध दिशेन काढून टाका.
शुगरिंगचे फायदे :
- साखरेपासून तयार करण्यात आलेल्या वॅक्सचे अनेक फायदे असतात. जे त्वचेवरील नको असलेल्या केसांसोबतच त्वचा उजळवण्यासाठीही मदत करतात.
- यामुळे बाजारातील महागडी उत्पादनं वापरण्याची गरज भासत नाही.
- शुगर वॅक्सिंगमुळे भाजण्याचा किंवा त्वचेला इन्फेक्शन होण्याचा धोका नसतो.
- शुगरिंचा वापर करून वॅक्स करत असाल तर इतर वॅक्सिंग ट्रिटमेंटपेक्षा कमी वेळ लागतो.
- साखरेपासून तयार करण्यात आलेल्या वॅक्सचा वापर करून नको असलेले केस काढण्यासाठी स्ट्रिप्सची गरज भासत नाही. त्याचबरोबर यामुळे वेदनांचाही सामना करावा लागत नाही.