त्वचेवरील घाण, तेल आणि मृतपेशी काढून टाकण्यासाठी त्वचेला क्लिंजिंग करणं गरजेचं असतं. यामुळे फक्त चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स काढले जात नाही तर त्वचेचं आरोग्य राखण्यासाठीही मदत होते. क्लिंजिंग त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. चेहरा उजाळवण्यासोबतच घाण दूर करण्याचं काम क्लिंजिंग करतं. पण अनेकदा महिलांना एक प्रश्न सतावत असतो की, दिवसातून किती वेळा फेस क्लिंजिंग करणं गरजेचं असतं. जाणून घेऊया क्लिंजिंग करण्याची योग्य पद्धत आणि किती वेळा करावं त्याबाबत...
क्लींजिंग म्हणजे नक्की काय?
क्लींजिंग चेहऱ्यावरील मेकअप, घाम, धूळ, माती आणि तेल स्वच्छ करण्याचं काम करतं. त्याचसोबत चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यासाठीही हे फायदेशीर ठरतं. हे चेहऱ्यावरील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासोबतच त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करतं.
कसं कराल क्लिंजिंग?
फेस क्लिंजिंग करण्यासाठी पहिले आपले हात स्वच्छ करा. त्यानंतर मेकअप रिमूव्हरने चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हातावर थोडंसं क्लिंजर घ्या आणि त्याने काही वेळ मसाज करा. आता चेहरा कोमट पाण्याने धुवून स्वच्छ करा. त्यानंतर क्रिम किंवा मॉयश्चरायझर अप्लाय करा.
एका दिवसात किती वेळा कराल क्लिंजिंग?
प्रत्येक व्यक्तीने दररोज 2 वेळा क्लिंजिंग करणं गरजेचं असतं. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि स्किन प्रॉब्लेम्सपासून सुटका होते.
होममेड क्लिंजर तयार करण्याची पद्धत :
दही :
मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टेबल स्पून दही आणि काकडीचा अर्धा तुकडा टाकून पेस्ट तयार करा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. तयार पेस्टने चेहऱ्यावर मसाज करा. 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून टाका. या होममेड क्लिंजरने चेहरा स्वच्छ होण्यास मदत होईल.
मध :
मध आणि लिंबाचा रस एकत्र करून हाटाने चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा.
ओट्स :
अर्धा लीटर पाणी किंवा दुधामध्ये अर्धा तासासाठी एक कप ओट्स उकळून घ्या. आता तयार लिक्विड गाळून कॉटन बॉल्सच्या मदतीने चेहरा आणि मानेवर लावा. 10 ते 15 मिनिटांनी मसाज करत चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. यामुळे त्वचा उजळण्यासोबतच त्वचेवरील इन्फेक्शन दूर होण्यासही मदत होईल.