प्रत्येकजण आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी फक्त महिलाच नाही तर पुरूष सुध्दा वेगवेगळे उपाय करत असतात. घरगुती उपायांपासून महागडी उत्पादनं विकत घेण्यापर्यंत चेहरा सुंदर दिसावा यासाठी प्रयत्न करत असतात. कारण जर चेहरा सुंदर असेल तर व्यक्तिमत्त्वात भर पडत असते, पण त्याच चेहऱ्यावर जर काळे डाग आणि पुळकुट्या असतील तसंच आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढवणाऱ्या नाकावर ब्लॅकहेड्स असतील तर चेहरा चांगला दिसत नाही. तुम्हालाही जर ही समस्या असेल तर काही घरगुती उपायांनी नाकावरील ब्लॅकहेड्स काढू शकता. चला तर मग जाणून घेऊया, चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कसे दूर करायचे.
गुलाबजल
नाकावरील ब्लॅकहेड्स मिटवण्यासाठी एक छोटा चमचा मीठ आणि एक चमचा गुलाबजलचे वाटीमध्ये मिश्रण करा. जास्त वेळ न लावता हे नाकाला किंवा ब्लॅकहेड्सला लावा. गुलाबजलाने तुमचा चेहरा उजळेल. आठवड्यातुन एकदा हा प्रयोग केला तर फरक दिसून येईल.
लिंबू
ब्लॅकहेड्स असलेल्या भागाला लिंबाच्या रसाने चोळुन घ्या. मग त्यावर मीठ लावून हळु हळु मसाज करा. १० मिनिटां नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातुन दोन वेळा हा प्रयोग करा.
कोमट पाणी
चेहऱ्यावरील अतिरीक्त तेल घालवण्यासाठी रोज नियमित आपला चेहरा कोमट पाण्याने धुवायला हवा. जास्तीत जास्त दिवसातुन दोन वेळा चेहरा धुवावा. कारण अधिक वेळा चेहरा धुतल्यास, त्वचा कोरडी होऊ शकते. चेहरा धुण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी. असं केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र बंद होणार नाहीत आणि ब्लॅकहेड्स होण्याची शक्यतादेखील कमी होईल.
संतुलीत आहार
दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या. हिरव्या भाज्या आणि फळं जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा. चांगला आणि पौष्टीक आहार तुमच्या त्वचेशी संबंधित प्रत्येक समस्या तुमच्यापासून दूर ठेवतो. जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाणं टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. यामुळे ब्लॅकहेड्स येण्यापासून तुम्ही थांबवू शकता. साखर आणि चरबीयुक्त पदार्थ खाणं टाळा.
मेकअप काढून झोपा
(Image credit- Signa global)
झोपताना आपल्या चेहऱ्यावरील मेकअप काढायला विसरू नका. कारण मेकअप लावून तसंच झोपल्याने छिद्र बंद राहण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्लॅकहेड्स येण्याला वाव मिळतो. त्यामुळे तुम्ही मेकअप काढून झोपा. मेकअप काढण्यासाठी चांगल्या ब्रॅण्डचा मेकअप रिमूव्हर वापरा. तसेच महिन्यातून एकदा किंवा दोनदा फेस क्लिनअप नक्की करून घ्या.
(टीप-वरील सर्व उपाय घरगुती आहेत. आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)