हल्ली अनेक जण चष्म्याचा वापर करतात. काही जण फॅशन म्हणून चष्मा वापरतात, तर काही लोकं डोळ्यांच्या समस्यांमुळे चष्म्याचा वापर करतात. पण सतत चष्मा लावल्याने नाकावर व्रण उठतात. अनेकदा चष्म्यामुळे पडलेले हे डाग डोकेदुखी बनतात. अनेक उपाय करूनही हे डाग दूर होत नाहीत. अशातच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही घरगुती उपाय ज्यांचा वापर करून तुम्ही हे डाग दूर करू शकता.
- कोरफडीचा गर चेहऱ्यावरील डाग किंवा व्रण घालवण्यासाठी फायदेशीर ठरतो. यासाठी कोरफडीचं ताजं पान घेऊन त्यातील गर काढून घ्या. हा गर चेहऱ्यावरील डागांवर लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. ज्यामुळे चष्म्यामुळे तयार झालेल्या डागांपासू सुटका होण्यास मदत होईल.
- बटाट्यामध्ये त्वचेसाठी फायदेशीर असलेले अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात. यासाठी तुम्ही एक कच्चा बटाट्याची साल काढून त्याचा रस काढून घ्या आणि 15 मिनिटांपर्यंत चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. असं आठवड्यातून 3 ते 4 वेळा केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होईल.
- काकडी आपल्या त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. काकडी कापून त्याचा रस काढून घ्या. हा रस चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होईल.
- गुलाब पाण्याचा उपयोग चेहऱ्याची नैसर्गिक सुंदरता वाढविण्यासाठी उपयोग करण्यात येतो. कापसाच्या मदतीने गुलाब पाणी चेहऱ्यावर लावा. काही वेळ चेहऱ्यावर ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.