(Image Credit : NewBeauty)
हिवाळ्याची सुरुवात होताच आपली त्वचा कोरडी होऊ नये म्हणून आपण तिची जास्त काळजी घेतो. विंटर सीझनसाठी खास प्रोडक्ट्सही मार्केटमध्ये उपलब्ध होतात. आपण अनेक विंटर प्रोडक्ट्स खरेदी करतो. पण आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरून जातो ती म्हणजे बदललेल्या वातावरणानुसार आपण आपल्या त्वचेची, केसांची काळजी घेतोच, तसचं आपल्या नखांचीही काळजी घेणं आवश्यक असतं. बदलणाऱ्या वातावरणाचा आपल्या त्वचेप्रमाणेच नखांवरही परिणाम होत असतो. त्वचेप्रमाणेच नखांनाही ड्रायनेसचा सामना करावा लागतो. हात धुण्यासाठी वापरण्यात येणारा साबण नखं कोरडी होण्यासाठी कारणीभूत ठरतो. अनेकदा कोरडेपणामुळे नखं कोरडी आणि कमकुवत होतात. जाणून घेऊयात थंडीमध्ये नखांची काळजी घेण्यासाठीच्या काही टिप्सबाबत...
मॉयश्चरायझर
त्वचेवर मॉयश्चरायझर लावताना नखांवरही मॉयश्चरायझर लावा. नखांच्या आजूबाजूच्या त्वचेवर व्यवस्थित लोशन किंवा क्रिम लावा. रात्री झोपताना हॅन्डक्रिम लावून झोपा. दिसभरात वेळ मिळेल तेव्हा हातांवर हॅन्डक्रिम लावा. नखांच्या आजूबाजूच्या त्वचेवरही हॅन्डक्रिमचा वापर करा. यामुळे नखांच्या आजूबाजूची त्वचा आणि नखं कोरडी होत नाहीत.
गरम पाणी
वातावरणातील थंडाव्याचा परिणाम पाण्यावरही होतो. प्रत्येक वेळी गरम पाण्याने हात धुणं शक्य होत नाही. सतत थंड पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे नखांना नुकसान पोहोचते. आठवड्यातून एकदा नखांना गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे त्यांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. त्यानंतर त्यावर खोबऱ्याचं तेल किंवा इतर कोणतंही ऑइल लावा.
ग्लव्सचा वापर करा
थंड पाण्यापासून नखांचं रक्षण करण्यासाठी हातांमध्ये ग्लव्सचा वापर करा. रबर ग्लव्स अगदी सहजपणे मार्केटमध्ये उपलब्ध होतात. त्यांच्या वापर करूनच भांडी किंवा कपडे धुवा. असं केल्यामुळे नखांचं थंड पाणी आणि साबणापासून रक्षण होऊ शकतं.
डाएटवर लक्ष ठेवा
आपल्या डेली डाएटमध्ये प्रोटीन असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. त्यासाठी तुम्ही डाळी, अंडी, दूध आणि बीन्सचा समावेश डाएटमध्ये करू शकता. व्हिटॅमिन बीसुद्ध नखं मजबूत करण्यासाठी मदत करतात. अशातच डाएटमध्ये अशा पदार्थांचा आहारात समावेश करा, ज्यांमध्ये व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असतं.